मुंबई : वर्ल्ड कप 2023आधी सुरू असलेल्या सराव सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा स्ट्राइक बॉलर मिचेल स्टार्क याने कहर केला आहे. पठ्ठ्याने सराव सामन्यामध्ये हॅट्रिक घेत वर्ल्डकप मधील इतर संघांना धोक्याचा इशारा दिला. नेदरलँड संघासोबत झालेल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळडूंनी दमदार खेळ केला. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया सोबत भारतीय संघाचा पहिला सामना होणार आहे. 8 ऑक्टोबरला हा सामना होणार असून या सामन्यामध्ये भारतीय संघासाठी स्टार्क घातक ठरू शकतो. याची झलक आपण कालच्या सामन्यात पाहिली. पहिल्या सात चेंडूतच हॅट्रिक पूर्ण करत त्याने सर्वांना आपली ताकद दाखवून दिली.
या सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 23 षटकात 7 गडी गमावून 166 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यासोबतच कॅमेरून ग्रीन याने 26 बॉलमध्ये 34 धावांची महत्त्वाची खेळी केली. नेदरलँड्सकडून रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, बास डी लीडे आणि लोगन व्हॅन बीक यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
मिचेल स्टार्कने पहिली ओव्हर टाकली यामधील ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर ओ’डॉडला इनस्विंगवर पायचीच केलं. भोपळाही न फोडता तो बाद झाला. त्यानंतर सहाव्या चेंडूवर वेस्ली बॅरेसी याला क्लीव बोल्ड करत शून्यावर माघारी पाठवलं. त्यानंतर संघासाठी तिसरी ओव्हर आणि वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर स्टार्कने डी लीडे यालाही आऊट करत आपली हॅट्रीक पूर्ण केली.
नेदरलँड संघ: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, वेस्ली बॅरेसी, स्कॉट एडवर्ड्स (C/W), शरीझ अहमद, आर्यन दत्त, रोलोफ व्हॅन डर मर्वे, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकरेन, लोगन व्हॅन बीक, रायन क्लेन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, कॉलिन अकरमन, साकिब झुल्फिकार, बास डी लीडे.
ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (C), अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ट्रॅव्हिस हेड, शॉन अॅबॉट.