पाकिस्तान क्रिकेट टीमने मोहम्मद रिझवान याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियावर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. पाकिस्तानने 22 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकली. त्यानंतर आता उभयसंघात 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने या मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने 29 धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी 94 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगसमोर पाकिस्तानला 9 विकेट्स गमावून 64 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
जोरदार पावसामुळे टॉसला विलंबाने झाला. पावसामुळे अनेक षटकांचा खेळ वाया गेला. अनेक मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर पाऊस थांबला. त्यानंतर 7 ओव्हरचा खेळ होणार असल्याचं निश्चित झालं. पाकिस्तानने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्स गमावून 7 ओव्हरमध्ये 93 धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियासाठी ग्लेन मॅक्सवेल याने सर्वाधिक धावा केल्या. मॅक्सवेलने 19 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्ससह 43 रन्स केल्या. मॅथ्यू शॉर्ट 7, जॅक फ्रेझर मॅकगर्क 9 आणि टीम डेव्हिड याने 10 धावा केल्या. तर मार्कस स्टोयनिस याने अखेरीस 7 बॉलमध्ये नॉट आऊट 21 रन्स केल्या आणि ऑस्ट्रेलियाला 90 पार पोहचवलं. पाकिस्तानकडून अब्बास अफ्रिदी याने 2 विकेट्स घेतल्या. नसीम शाह आणि हरीस रौफ या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.
पाकिस्तानचे टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज सपशेल ढेर झाले. साहिबजादा फरहान 8, बाबर आझम 3, उस्मान खान आणि आघा सलमान या दोघांनी प्रत्येकी 4 धावा केल्या. कॅप्टन मोहम्मद रिझवान, इरफान खान आणि नसीम शाह या तिघांना भोपळाही फोडता आला नाही. तर फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठण्यात यश आलं मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. हसीबुल्लाह खान याने 12 तर शाहीन अफ्रिदीाने 11 धावा केल्या. तर अब्बास अफ्रिदीने सर्वाधिक 20 नाबाद धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि झेवियर बार्टलेट या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. एडम झॅम्पाने दोघांना बाद केलं. तर स्पेन्सर जॉन्सनने एक विकेट मिळवली.
ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
Pacers do the job for Australia in the rain-hit first T20I ⚡#AUSvPAK: https://t.co/lkISARyrgQ pic.twitter.com/tA4gWs1ga7
— ICC (@ICC) November 14, 2024
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि आणि विकेटकीपर), बाबर आझम, साहिबजादा फरहान, उस्मान खान, आगा सलमान, इरफान खान, हसीबुल्ला खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि नसीम शाह.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : जोश इंग्लिस (कर्णधार आणि विकेटकीपर ), जेक फ्रेझर-मॅकगर्क, मॅथ्यू शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा आणि स्पेन्सर जॉन्सन.