पाकिस्तान क्रिकेट टीमच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 140 धावांवर खुर्दा उडवला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता सामन्यासह मालिका विजयाची दुहेरी आणि सुवर्णसंधी आहे. पाकिस्तानने याआधी 2002 साली ऑस्ट्रेलियामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली होती. त्यामुळे आता पाकिस्तान 22 वर्षांची प्रतिक्षा संपवत कांगारुंना त्यांच्या घरात लोळवत मालिका जिंकणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
कॅप्टन मोहम्मद रिझवान याच्या टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियावर धक्क्यावर धक्के देत बॅकफुटवर ढकललं. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करुन डाव सावरता आला नाही. पाकिस्तानच्या गोलंजदाजांसमोर कांगारुंनी गुडघे टेकले. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 31.5 ओव्हरमध्ये 140 वर गुंडाळलं.
ऑस्ट्रेलियाकडून सीन एबॉट 30, मॅथ्यू शॉर्ट 22, एडम झॅम्पा याने 13 तर आरोन हार्डी आणि स्पेन्सर जॉन्सन या दोघांनी प्रत्येकी 12-12 धावा केल्या. तर इतरांना पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर प्रतिकारही करता आला नाही. ऑस्ट्रेलियाचे 2 फलंदाज शून्यावर बाद झले. तर तिघे 7 आणि एक फलंदाज 8 धावांवर आऊट झाला. पाकिस्तानसाठी शाहीन अफ्रिदी आणि नसीम शाह या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. हरीस रौफने दोघांना बाद केलं. तर हसनैने एक विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली. तर कूपर कॉनोली याला रिटायर्ड हर्ट झाल्याने मैदानाबाहेर जावं लागलं.
पाकिस्तान मालिका जिंकणार?
Pacers reign supreme once again! 🔥
Australia have been skittled in 31.5 overs as we require 141 runs for the series win 🎯#AUSvPAK pic.twitter.com/IP8Lbk3SU2
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 10, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : जोश इंग्लिस (कर्णधार आणि विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कूपर कॉनोली, मार्कस स्टॉइनिस, आरोन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, शॉन ॲबॉट, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन आणि लान्स मॉरिस
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, कामरान गुलाम, आगा सलमान, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद हसनैन.