AUS vs PAK Test: मारो मुझे मारो! दुसऱ्या डावात पाकिस्तानची स्थिती ढासळली, ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर

| Updated on: Jan 05, 2024 | 3:03 PM

तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानची स्थिती एकदम वाईट झाली आहे. दुसऱ्या दिवसखेर पाकिस्तानकडे बऱ्यापैकी आघाडी होती. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पाकिस्तानने 14 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पण ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं.

AUS vs PAK Test: मारो मुझे मारो! दुसऱ्या डावात पाकिस्तानची स्थिती ढासळली, ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर
AUS vs PAK Test : ये कैसा मज्जाक है भाई! पहिल्या डावात आघाडी मिळूनही पाकिस्तान फूसsss
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे प्रत्येक कसोटी सामन्याचं महत्त्व अधोरेखित होत आहे. जय पराजय आणि ड्रॉ गुणतालिकेवर प्रभाव टाकत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ पहिल्या स्थानावर होता. मात्र सलग दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. आता तिसरा सामना गमवण्याची वेळही आली आहे. कारण तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानची स्थिती नाजूक झाली आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात 14 धावांची आघाडी मिळवूनही काहीच फायदा झालेला नाही. कारण दुसऱ्या डावात अवघ्या 68 धावांवर 7 गडी तंबूत परतले आहे. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात उर्वरित तीन खेळाडू तंबूत असतील अशी स्थिती आहे. त्यामुळे या मालिकेत पाकिस्तानला 3-0 ने व्हाईट वॉश मिळेल यात काही शंका नाही. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवताच ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठणार आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 2 गडी बाद 116 धावा केल्या होत्या. मात्र तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात खेळपट्टीचा रंगच बदलला. 183 धावा करत ऑस्ट्रेलियाचे 8 गडी तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाला सर्वबाद 299 धावा करता आल्या. त्यामुळे पाकिस्तानला नाममात्र का होईना 14 धावांची आघाडी मिळाली. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. पाकिस्तानचा एकही खेळाडू दुसऱ्या डावात खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. दिवसअखेर 68 धावांवर 7 गडी तंबूत होते. तर मोहम्मद रिझवान नाबाद 6 आणि आमेर जमाल 0 या धावसंख्येवर खेळत होता.

पहिल्या डावात आमेर जमालने उत्तम गोलंदाजी टाकली आणि ऑस्ट्रेलियाचे 6 गडी बाद केले. दुसरीकडे पाकिस्तानचा डाव सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा आक्रमक पवित्रा दिसला. पहिल्या षटकापासूनच पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं. अब्दुल्ला शफीक 0, सईम अयुबम 33, शान मसूद 0, बाबर आझम 23, सऊद शकील 2, साजिद खान 0, आघा सलमान 0 असे बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर मिचेल स्टार्क, नाथन लियॉन, ट्रेव्हिस हेड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दोन संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लियॉन, जोश हेझलवूड.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, सईम अयुब, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, साजिद खान, हसन अली, मीर हमजा