मुंबई : तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर पाकिस्तानने मजबूत पकड मिळवली. पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 313 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करत आघाडी मिळवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न आहे. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी कोंडीत पकडलं. खराब प्रकाशामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ फक्त 47 षटकांचा झाला. त्यामुळे ही स्पर्धा आता ड्रॉच्या दिशेने झुकल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. कारण दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या धावांची बरोबरी करण्याची संधी ऑस्ट्रेलियाकडे होती. पण तसं झालं नाही. 47 षटकांचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 2 गडी बाद 116 धावा केल्या होत्या. अजूनही पाकिस्तानकडे 197 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशी आघाडी मोडून मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियासमोर आहे. अन्यथा हा सामन्याचा निकाल लागणं खूप कठीण आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया बिनबाद 6 धावा होत्या.
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 47 षटकांचा सामना करत 2 गडी गमवून 116 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानच्या पहिल्या डावातील धावसंख्या पार करण्यासाठी अजूनही 197 धावांची गरज आहे. शेवटी कसोटी खेळत असलेला डेविड वॉर्नर 34 धावांवर बाद झाला. तर उस्मान ख्वाजाचं अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मार्नस लाबुशेननं 66 चेंडूत 23 आणि स्टीव्ह स्मिथने 7 चेंडूत 6 धावा करत खेळत आहेत. पाकिस्तानकडून आमेर जमाल आणि आघा सलमान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकल्यास विजयी टक्केवारी फायदा होईल. तर पाकिस्तानने जिंकल्यास किमान दुसरं तिसरं स्थान मिळवण्यात यश मिळेल. त्यात भारत दक्षिण अफ्रिका सामन्याचा निकालही खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लियॉन, जोश हेझलवूड.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आघा सलमान, आमेर जमाल, साजिद खान, हसन अली, मीर हमजा