मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं हे 13 वं पर्व आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक जेतेपद जिंकण्याचा मान ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यामुळे प्रत्येक वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला फेव्हरेट मानलं जातं. पण यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाची सुमार कामगिरी दिसून आली आहे. भारताकडून 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरूद्धही पराभवाच्या वेशीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 7 गडी गमवून 311 धावा केल्या आणि विजयासाठी 312 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना ऑस्ट्रेलियाचा निम्म्याहून अर्धा संघ अवघ्या 70 धावांवर तंबूत परतला आहे. एकही फलंदाजी साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. दुसरीकडे प्रथम क्षेत्ररक्षण करताना ऑस्ट्रेलियाने सहा घोडचुका केल्या आणि त्याचा भुर्दंड भरावा लागला.
दक्षिण आफ्रिकेचा संघ जेव्हा मैदानात उतरला तेव्हा पहिल्या गड्यासाठी 108 धावांची भागीदारी केली. कर्णधार टेम्बा बावुमा आणि क्विंटन डिकॉक यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. खासकरून या भागीदारीत बावुमाला एकापेक्षा जास्त जीवदान मिळाले. 10 षटकात अॅडम झाम्पाने झेल सोडला. त्यानंतर 13 व्या षटकात विकेटकीपर जॉश इंग्लिस याने झेल सोडला. या चुकांमधून ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनी कोणताच धडा घेतला नाही. 16 षटकात शॉन एबटनेही कॅच ड्रॉप केला.
झेल सोडण्याचा कित्ता पुढेही सुरुच राहीला. कर्णधार पॅट कमिन्स यानेही तीच चूक केली. 30 व्या षटकात कर्णधार पॅट कमिन्सनं साधा झेल सोडला. मार्करम तेव्हा फक्त 1 धावेवर खेळत होता. त्यानंतर त्याने 56 धावा केल्या आणि बाद झाला.
49 व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मिचेल स्टार्कने कॅच सोडला. दोन चेंडूनंतर पुन्हा एकदा मार्कस स्टोइनिसने मार्को यानसनचा झेल सोडला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसला. विकेट गेली की समोरच्या संघावर दडपण येतं. मात्र जीवदान मिळालं की फलंदाज संधीचं सोनं करून जातो.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शमसी.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.