पर्थ | वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता विजयाने केली आहे. विंडिजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या टी 20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात 37 धावांनी विजय मिळवला. विंडिजला ही मालिका 1-2 ने गमवावी लागली. मात्र विंडिजने या विजयासह क्लीन स्वीप टाळला. विंडिजने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 221 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 183 धावाच करता आल्या.
ऑस्ट्रेलियाची विजयी धावांचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात झाली. कॅप्टन मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी 68 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर विंडिजने ऑस्ट्रेलियाला ठराविक अंतराने धक्के दिले. मिचेल मार्श 17, एरोन हार्डी 16, डेव्हिड वॉर्नर 81 आणि जोश इंग्लिस 1 धावा करुन आऊट झाले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल याने 12 धावा केल्या. टीम डेव्हीड आणि मॅथ्यू वेड हे दोघे नाबाद परतले. मात्र या दोघांना विजय मिळवून देता आला नाही. टीम डेव्हिड याने नाबाद 41 आणि मॅथ्यू वेड 7 रन्सवर नॉट आऊट परतला. विंडिकडून रोमरियो शेफर्ड आणि रोस्टन चेस या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अकेल होसेन याच्या खात्यात 1 विकेट गेली.
वेस्ट इंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र विंडिजची निराशाजनक सुरुवात झाली. जे चार्ल्स 4, निकोलस पूरन 1 आणि कायले मेयर्स 11 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे विंडिजची स्थिती 3 बाद 17 अशी झाली. त्यानंतर रोस्टन चेस आणि रोवमेन पॉवेल या दोघांनी टीमचा डाव सावण्याचा प्रयत्न केला. मात्र यात दोघांना फार मोठी भागीदारी करता आली नाही. चेस 37 आणि पॉवेल 21 धावा करुन माघारी परतले. त्यामुळे विंडिजची स्थिती 5 बाद 79 अशी स्थिती झाली.
त्यानंतर आंद्रे रसेल आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांनी धुमाकूळ घातला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 139 धावांची विक्रमी भागीदारी करत वर्ल्ड रेकॉर्ड केला. या दोघांनी टी 20 क्रिकेटमध्ये सहाव्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी केली. आंद्रे रसेल याने एडम झॅम्पा याच्या एका ओव्हरमध्ये 4 सिक्स आणि एका चौकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. रसेल 29 बॉलमध्ये 71 धावा करुन आऊट झाला. तर शेरफेन रुदरफोर्ड 40 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने 67 धावांवर नाबाद परतला.
ऑस्ट्रेलियाच्या पाचही गोलंदाजांनी किमान 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून झेविअर बार्टलेट याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, आरोन हार्डी आणि एडम झॅम्पा या चौघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन| मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), ॲडम झाम्पा, झेवियर बार्टलेट, स्पेन्सर जॉन्सन आणि जेसन बेहरेनडॉर्फ
वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), कायल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन आणि अल्झारी जोसेफ.