मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात कांगारुंनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण डेविड वॉर्नर नावाच्या वादळाने हा निर्णय फोल ठरवला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 7 गडी गमवून 213 धावा केल्या आणि विजयासाठी 214 धावांचं आव्हान ठेवलं. वेस्ट इंडिजने 8 गडी गमवून 202 धावांपर्यंत मजल मारली. यासह वेस्ट इंडिजचा पहिल्या टी20 सामन्यात 11 धावांनी पराभव झाला. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर याचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. 36 चेंडूत 70 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या व्यतिरिक्त जोश इंग्लिस आणि टिम डेविड याने चांगली खेळी केली. तर वेस्ट इंडिजकडून रस्सेलने 3, अल्झारी जोसेफने 2, तर होल्डर आणि शेफर्डने प्रत्येकी एक गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ब्रँडन किंग आणि जॉनसन चार्ल्स यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 89 धावांची भागीदारी केली. 8 षटकात 10 च्या सरासरीने रेपो मेंटेंन ठेवला होता. पण चार्ल्स आमि ब्रँडन किंग बाद झाल्यानंतर घसरण लागली. ब्रँडन किंगने 53, तर जॉनसन चार्ल्सने 42 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त कोणीही खास खेळी करू शकलं नाही. आक्रमकपणे फटकेबाजी करताना धावांऐवजी विकेट देऊन बसले. जेसन होल्डरने शेवटी येत 15 चेंडूत 34 धावा केल्या. पण विजयाच्या वेशीवर संघाला आणता आलं नाही.आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 11 फेब्रुवारीला पुढचा सामना होणार आहे.
वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), आंद्रे रसेल, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेविड वॉर्नर, जोश इंग्लिस, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), शॉन एबॉट, एडम झम्पा, जेसन बेहरेनडॉर्फ, जोश हेझलवूड