बेनोनी | सिनिअर मेन्सनंतर आता अंडर 19 ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचं स्वप्न भंग केलं आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 79 धावांनी मात करत चौथ्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 254 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचं 43.5 ओव्हरमध्ये 174 धावांवर पॅकअप झालं. ऑस्ट्रेलियाने यासह 2010 नंतर पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. तर टीम इंडिया वर्ल्ड कप विजयाचा षटकार मारण्यात अपयशी ठरली.
टीम इंडियाकडून आदर्श सिंह याने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर मुरुगन अभिषेक याने 42 धावा जोडल्या. मुशीर खान 22 धावा केल्या. तर नमन तिवारी 14 धावांवर नाबाद परतला. या व्यतिरिक्त इतर सर्वांनी निराशा केली. सोलापूरच्या अर्शीन कुलकर्णी आणि बीडच्या सचिन धस यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र हे दोघे, कॅप्टन उदय सहारन आणि प्रियांशू मुलिया या चौघांनी घोर निराशा केली. अर्शीन 3, सचिन 9, उदय 8 आणि मुलिय याने 9 धावा केल्या. तर राज लिंबानी आणि अरावेली अविनाश या दोघांना भोपळाही फोडता आला नाही.
ऑस्ट्रेलियाकडून महली बियर्डमन आणि राफ मॅकमिलन या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. कॅलम विडलर याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर चार्ली अँडरसन आणि टॉम स्ट्रेकर या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
दरम्यान ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला वर्षभरात सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून रोखलंय. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभवाची धुळ चारली. त्यानंतर आता अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ ठरली आहे.
ऑस्ट्रेलिया अंडर 19 वर्ल्ड चॅम्पियन
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🏆
After #WTC23 and #CWC23, Australia complete the hat-trick with #U19WorldCup 2024 😍 pic.twitter.com/tIU7bo9k9h
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 11, 2024
टीम इंडिया अंडर 19 प्लेईंग इलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.
ऑस्ट्रेलिया अंडर 19 प्लेईंग ईलेव्हन | ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर.