ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी20 सामन्यातही पाकिस्तानला धोबीपछाड दिला. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आगा सलमानकडे तिसऱ्या टी20 सामन्यांची धुरा सोपवण्यात आली होती. मोहम्मद रिझवानला आराम दिल्याने त्याच्याकडे ही जबाबदारी आली होती. पण त्याच्या नेतृत्वातही पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात पाकिस्तानने नुकतीच वनडे मालिका जिंकली होती. मात्र त्याचा रंग आता फिका पडला आहे. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची टी20 मालिका 3-0 ने खिशात घालत व्हाईटवॉश दिला आहे. पाकिस्तानने 18.1 षटकात सर्व गडी गमवून 117 धावा केल्या आणि विजयासाठी 118 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमवून 11.2 षटकात पूर्ण केलं. या विजयासात मार्कस स्टोयनिसचा झंझावात पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाला सुरुवातील काही धक्के बसल्यानंतर मार्कस स्टॉयनिसने पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसं काढली आहे. 25 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने नाबाद 61 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन अफ्रिदी, जहाँदाद खान आणि अब्बास अफ्रिदी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. या व्यतिरिक्त गोलंदाजीत काहीच खास करता आलं नाही.
पाकिस्तानने पहिल्या दोन विकेटपर्यंत चांगली कामगिरी केली होती. पाकिस्ताने पॉवरप्लेमध्ये 2 गडी गमवून 61 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर फलंदाजीला उतरण लागली. हासीबुल्लाह खान 24 धावा करून बाद झाला आणि त्यानंतर रांगली लागली. उस्मान खान आणि आगा सलमान स्वस्तात बाद झाले. तर बाबर आझमीची खेळी 41 धावांवर आटोपली. त्याने 28 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. इरफान खान 10, अब्बास आफ्रिदी 1, जहाँदाद खान 5, शाहीन आफ्रिदी 16, सुफियान मुकीम 1 धाव करून बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून अरॉन हार्डीने 3, एडम झाम्पाने 2, स्पेन्सर जॉन्सनने 2, झेव्हियर बार्टलेटने 1 आणि नाथन एलिसने 1 गडी बाद केला.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, जोश इंग्लिस (विकेटकीपर/कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, ॲडम झाम्पा.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, बाबर आझम, हसीबुल्ला खान (विकेटकीपर), उस्मान खान, आगा सलमान (कर्णधार), इरफान खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, जहाँदाद खान, हरिस रौफ, सुफियान मुकीम.