मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील 27 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झाला, शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रोमहर्षक सामन्यात कांगारूंनी 5 धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या 389 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने आपली सर्व ताकद लावलेली. मात्र 50 ओव्हरमध्ये न्यूझीलंड संघाला 383 धावांपर्यंत मजला मारता आली. न्यूझीलंडकडून रचिन रविंद्र याची 116 धावांची शतकी खेळी व्यर्थ गेली. त्यासोबतच जिमी नीशम याचीही अर्धशतकी खेळी वाया गेली, त्याने मैदानावर टिकत सामना शेवटपर्यंत जिवंत ठेवला होता. मात्र अवघ्या 5 धावांनी किंवींचा पराभव झाला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून प्रथम बॅटींग करताना डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड यांनी 175 धावांची सलामी दिलेली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना या जोडीने घाम फोडला होता, त्यानंतर टॉम लॅथम याने फिलिप्स याला बोलावलं, गड्याने एक नाहीतर दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवलंच त्यासोबत स्टीव्ह स्मिथ यालाही 18 धावांवर आऊट करत तीन विकेट घेत कांगारूंच्या बॅटींगला सुरूंग लावला. वॉर्नर 81 तर ट्रॅव्हिस हेड 109 धावांवर माघारी परतला.
तीन विकेट गेल्यावर धावांना आता चाप बसणार असू वाटू लागलं होतं मात्र मॅक्सवेलच्या 24 बॉलमध्ये 41 धावा, जोस इंग्लिस 28 बॉल 38 धावा आणि कमिन्स याने अवघ्या 14 बॉलमध्ये 37 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि ट्रेंट बोल्ट यांनी सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
न्यूझीलंड संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर त्यांनी सावध सुरूवात केली होती. मात्र आठव्या आणि दहाव्या ओव्हरमध्ये संघाला मोठे झटके बसले. डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग या दोघांना हेझलवूड याने माघारी पाठवलं. त्यानंतर रचिन रविंद्र याने एक बाजू लावून धरली होती, त्याला डॅरिल मिशेल याने साथ दिलेली. मात्र अर्धशतक होताच 54 धावांवर तोही आऊट झाला.
फिलिप्स 12 आणि लॅथम 21 धावांवर स्वस्तात बाद झाले. रचिनसुद्ध शतक करून 116 धांवावर आऊट झाला. त्यानंतर जिमी नीशम याने संघाचा मोर्चा आपल्या हाती घेतला आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना ओढला. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 58 धावांवर असताना तो रन आऊट झाला आणि न्यूझीलंड संघाचा पराभव झाला.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (W), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (w/c), ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट