चौथ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मिळालं ख्रिसमस गिफ्ट, झालं असं की भारताची धाकधूक वाढली

| Updated on: Dec 25, 2024 | 3:48 PM

ऑस्ट्रेलिया भारत चौथा कसोटी सामना खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यावर भारताची पुढची वाटचाल ठरणार आहे. असं असताना बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाला ख्रिसमस गिफ्ट मिळालं आहे.

चौथ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मिळालं ख्रिसमस गिफ्ट, झालं असं की भारताची धाकधूक वाढली
Follow us on

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला खूपच महत्त्व आलं आहे. मालिकेतील आघाडीशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी काही करून विजय मिळवायचा आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांनी कंबर कसली असून ऑस्ट्रेलियाने प्लेइंग 11 जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताची डोकेदुखी ठरलेला ट्रेव्हिस हेड पुन्हा एकदा फिट झाला आहे. दुखापतग्रस्त असल्याने खेळणार की नाही अशी शंका होती. मात्र आता फिट अँड फाईन असल्याचं पॅट कमिन्सने सांगितलं आहे. तसेच प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. त्यामुळे त्याला बाद करण्यासाठी टीम इंडियाला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने संघात दोन बदल केले आहेत. यात 19 वर्षीय युवा ओपनर सॅम कॉन्सटस हा नाथन मॅक्स्वीनीची जागा घेईल. या सामन्यात त्याचं डेब्यू असणार आहे. दुसरीकडे. जखमी जोश हेझलवूड बाद झाल्याने त्याच्या जागी स्कॉट बोलँड खेळणार आहे.

ख्रिसमसच्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने टीमसाठी एक पर्यायी ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं. यावेळी ट्रेव्हिस हेडने सर्वात कठीण फिटनेस टेस्ट दिली. यात रनिंग ड्रिल्ससारख्या गोष्टी होत्या. त्यानंतर त्याला फिट असल्याचं घोषित करण्यात आलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोटात आनंदाचं तर भारताच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. या मालिकेत ट्रेव्हिस हेड फॉर्मात असल्याचं दिसत आहे. त्याने या मालिकेत शतकी खेळीसह चांगल्या धावा केल्या आहेत. तसेच भारताविरुद्ध त्याच्या खेळीला आणखी धार येते हे देखील तितकंच खरं आहे. एडिलेड आणि गाबा कसोटी त्याच्या शतकी खेळीने ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत होती.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, ‘त्याने काल आणि आज काही गोष्टी केल्या. आता त्याच्या दुखापतीबाबत कोणतीच चिंता नाही. तो खेळण्यास पूर्णपण सक्षम आहे. त्याला फिल्डिंग करताना काही समस्या झाली तर मॅनेज करू. पण तो पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे जास्त काही मॅनेज करण्याची गरज भासणार नाही.’

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन: उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्सटस, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिंस (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लॉयन, स्कॉट बोलँड.