टीम इंडियाच्या प्रशिक्षपदासाठी या नावाची जोरदार चर्चा, वर्ल्ड चॅम्पियन बनविण्यात होती महत्त्वाची भूमिका

| Updated on: May 14, 2024 | 5:54 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरु असताना बीसीसीआयने प्रशिक्षपदासाठी अर्ज मागवले आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदासाठी शेवटची स्पर्धा असणार आहे. राहुल द्रविडनंतर प्रशिक्षकपदावर कोण बसणार याची उत्सुकता वाढली आहे. त्यात एका नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. पण बीसीसीआय दहा वर्षानंतर असं करेल का हा देखील प्रश्न आहे.

टीम इंडियाच्या प्रशिक्षपदासाठी या नावाची जोरदार चर्चा, वर्ल्ड चॅम्पियन बनविण्यात होती महत्त्वाची भूमिका
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. राहुल द्रविडनंतर प्रशिक्षकपदावर कोण बसणार याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. पुन्हा एकदा विदेशी प्रशिक्षकावर विश्वास टाकला जाणार का? की स्वदेशी कोचला प्राधान्य दिलं जाईल याची उत्सुकता ताणली गेली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या विधानानंतर नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. त्यामुळे स्वदेशी विरुद्ध विदेशी कोच या वाद उफाळून आला आहे. जस्टीन लँगरने सँडपेपर प्रकरणानंतर ऑस्ट्रेलिया संघाला जेतेपद मिळवून दिलं होतं. आयपीएल 2024 स्पर्धेत जस्टीन लँगर याच्याकडे लखनौ सुपर जायंट्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे. त्याला प्रशिक्षकपदाबाबत विचारलं असता त्याने सकारात्मक उत्तर दिलं. टाईम्स ऑफ इंडियाने विचारलेल्या प्रश्नावर जस्टीन लँगर म्हणाला की, “ठीक आहे, मी उत्सुक आहे.”

“मी कधी याबाबत जास्त विचार केलेला नाही. माझ्या मनात कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकासंबधी मनापासून सन्मान आहे. कारण मी प्रेशर समजू शकतो. भारतीय संघाचं प्रशिक्षकपद भूषवणं ही एक विलक्षण भूमिका असेल. या देशात मी जितकी प्रतिभा पाहिली आहे. ते पाहता या देशात ते करणं आकर्षक असेल.”, असं जस्टीन लँगर पुढे म्हणाला. म्हणजेच जस्टीन लँगर याने भारतीय प्रशिक्षकपदासाठी आपला होकार दिला आहे. दुसरीकडे, बीसीसीआय सचिव जय शाह यांनीही एक विदेशी कोच सहभागी करण्याचे संकेत दिले आहेत.

डंकन फ्लेचर हे भारतीय संघांचे शेवटचे विदेशी कोच होते. 2014 साली त्यानी पद सोडलं आमि त्यानंतर ही भूमिका अनिल कुंबल, रवि शास्त्री आणि राहुल द्रविड बजावत आहे. त्यामुळे एक दशकाहून अधिक काळ लोटला असताना बीसीसीआय पुन्हा विदेशी प्रशिक्षकावर विश्वास टाकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे, राहुल द्रविडल मुख्य प्रशिक्षकपदी राहायचं असल्यास अर्ज करावा लागणार आहे. याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे. पण राहुल द्रविड पुन्हा अर्ज करण्याची शक्यता कमीच आहे.

सँडपेपर प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन संघाला सावरण्यात जस्टीन लँगरचा मोठा हात आहे. जवळपास चार वर्षे त्यांनी संघासाठी मेहनत घेतली. 2018 साली झालेल्या प्रकरणानंतर 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाला पहिला टी20 वर्ल्डकप जिंकून दिला. जस्टीन लँगरने क्रिकेट कारकिर्दीत 105 कसोटी आणि 8 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत 45 च्या सरासरीने 7696 धावा केल्या आहेत. तर वनडेत 32 च्या सरासरीने 160 धावा केल्या आहेत.