मुंबई : ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करत कोट्यवधी भारतीयांचा भ्रमनिरास केला. एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठलेल्या भारताला ऑस्ट्रेलियाने रोखलं. त्यामुळे भारताचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरत क्रिकेटमध्ये कोणीच हात पकडू शकत नाही हे दाखवून दिलं. पण जेतेपदानंतर खेळाडूंचा उन्मादपणाचा सोशल मीडियावर पाणउतारा करण्यात आला. त्याला निमित्त ठरलं ते मिचेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर ठेवलेला पाय. मिचेल मार्शचा हा फोटो पाहून क्रीडाप्रेमींच्या डोक्यात तीव्र सणक गेली. क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर मिचेल मार्शला धारेवर धरलं. तसेच वर्ल्डकप ट्रॉफीचा मान ठेवण्याचा सल्ला दिला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यानेही मिचेल मार्शला खडे बोल सुनावले. आता या घटनेला 11 दिवस उलटून गेल्यानंतर मिचेल मार्शनं मौन तोडलं आहे. त्या फोटोमागच्या भावना काय होत्या? याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
मिचेल मार्श याने ऑस्ट्रेलियन मीडियाशी बोलताना सांगितलं की, “वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवून अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी त्याबाबत जास्त विचार केला नव्हता. मी सोशल मीडियावर काय घडलं हे पाहिलं नाही. पण जो भेटतो तो हेच सांगतो की प्रकरण खूप तापलं आहे. आता या प्रकरणावर चर्चा थांबली आहे. पण त्या फोटोत असं काहीच नव्हतं.” मिचेल मार्शनं स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्याच्याविरोधत पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
मिचेल मार्शविरोधात जर गुन्हा दाखल झाला तर आयपीएल 2024 स्पर्धेत खेळण्याबाबत मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. भारतात आल्यावर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. सध्या ऑस्ट्रेलियन संघ भारतात टी20 सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी मार्शला आराम देण्यात आला आहे. स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल आणि एडम झाम्पा मालिकेसाठी थांबले होते. मात्र तिसऱ्या टी20 सामन्यानंतर वनडे वर्ल्डकप खेळलेल्या खेळाडूंना मायदेशी बोलवले आहे.
चौथ्या आणि पाचव्या टी20साठी पूर्ण नवीन संघ मैदानात उतरणार आहे. मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. चौथा सामना रायपूरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांचा जोर लागणार आहे. भारतीय संघाला मालिका विजयासाठी, तर ऑस्ट्रेलियाला मालिका बरोबरीसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.