अहमदाबाद | इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 50 ओव्हरआधीच ऑलआऊट केलंय. ऑस्ट्रेलियाचा डाव 49.3 ओव्हरमध्ये 286 धावांवर आटोपलाय. त्यामुळे आता इंग्लंडला वर्ल्ड कपमधील दुसऱ्या विजयसाठी 287 धावा कराव्या लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाकडून जोस इंग्लिसचा अपवाद वगळता सर्वांनी दुहेरी आकडा गाठला. मार्नस लबुशेन याने सर्वाधिक 71 धावा केल्या. तर इतरांना चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना ठराविक अंतराने आऊट केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अपेक्षित सुरुवातीनंतरही मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेन याने 83 बॉलमध्ये 7 चौकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. उंचपुरा ऑलराउंडर कॅमरुन ग्री यने 47 धावांचं योगदान दिलं. स्टीव्हन स्मिथ 44 रन्स करुन आऊट झाला. मार्कस स्टोयनिस 35 धावा करुन माघारी परतला. एडम झॅम्पा याने 29 धावांचं बहुमूल्य योगदान दिलं.
तर डेव्हिड वॉर्नर याने 15, ट्रेव्हिस हेड 11, पॅट कमिन्स 10 आणि मिचेल स्टार्क याने 10 धावा केल्या. तर जोश इंग्लिस 3 रन्सवर आऊट झाला. तसेच जोश हेझलवूड याने नाबाद 1 धाव केली. इंग्लंडकडून वोक्स व्यतिरिक्त आदिल राशिद याने 2 जणांना आऊट केलं. तर डेव्हिड व्हीली आणि लियाम लिविंगस्टोन या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलिया 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाला जर सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल, तर हा सामना जिंकावा लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडचं आव्हान हे संपुष्टात आल्यात जमा आहे. मात्र त्यानंतरही इंग्लंड ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून पुढील समीकरण बिघडवू शकते. इंग्लंड पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी 10 व्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जॉस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद आणि मार्क वुड.