मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील 18 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघामध्ये सुरू आहे. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना कांगारूंनी 367-9 धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांना मजबूत झोडपलं. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी धावांचा पाऊस पाडला. डेव्हिड वॉर्नरने 163 धावा आणि मिचेल मार्शने 121 धावा केल्या. पाकिस्तान संघाकडून परत एकदा गचाळ फिल्डिंग दिसली. पाचव्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर त्याचा एक कॅच घेतला गेला असता तर वॉर्नरच्या वादळापासून पाकिस्तान वाचलं असतं.
शाहिन आफ्रिदी पाचवी ओव्हर टाकत होता त्यावेळी मोठा फटका खेळण्याच्या नादात डेव्हिड वॉर्नर याचा कॅच उडाला. एकदम सोपा कॅच होता आणि खाली पाकिस्तानचा उसामा मीर हा खेळाडू होता. उसामा एकदम सहज हा कॅच घेईल असं वाटत होतं मात्र चेंडू पकडण्यात त्याला अपयश आलं. पाकिस्तानची गचाळ फिल्डिंग पहिल्यापासून डोकेदुखी राहिली आहे.
उसामा मीर याला शादाब खान याच्या जागी संघात जागा मिळाली होती. शादाब खान संघाचा उपकर्णधार आहे मात्र त्यालाही खराब प्रदर्शनामुळे बाहेर बसावं लागलं आहे. मात्र पाकिस्तान टीम मॅनेजमेंटला त्याला संधी देण्याचा पश्चाताप होत असणार हे मात्र नक्की. कारण गड्याने आपल्या स्पेलमध्ये ९ ओव्हरमध्ये १ विकेट घेत 82 धावांचा डोंगर उभा केला.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (C), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (WK), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (C), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (Wk), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रॉफ