भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना एडिलेडवर होणार आहे. हा डे नाईट सामना असून पिंक बॉलने खेळला जाणार आहे. पिंक बॉलचा सामना करताना खऱ्या अर्थाने फलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यात पहिला कसोटी सामना गमवल्याने ऑस्ट्रेलियन संघावर दडपण वाढलं आहे. कारण पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावात आघाडीचे फलंदाज सपशेल फेल ठरले होते. त्यात जोश हेझलवूडच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. पत्रकार परिषदेत वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याला भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्याविषयी प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने दिलेल्या उत्तराने अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. ‘तुम्हाला हा प्रश्न एखाद्या फलंदाजाला विचारायला हवा. मी आता पुढच्या कसोटी सामन्याकडे पाहात आहे.’ हेझलवूडच्या या वक्तव्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि मिडिया यांच्यात चर्चांना उधाण आलं आहे. या वक्तव्यामुळे संघात फूट पडल्याच्या चर्चांना जोर मिळत आहे. मीडिया आणि सोशल मीडियावर हे प्रकरण इतकं गाजलं की ट्रेव्हिस हेडला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
ट्रेव्हिस हेडने 7 न्यूजशी बोलताना सर्व चर्चांचं खंडन केलं आहे. ट्रेव्हिस हेडने सांगितलं की, ‘मला वाटते एक खराब आठवड्याच्या वक्तव्यावरून उगाचच वादंग केला जात आहे. टीका करणं ठीक आहे. आम्ही ते समजू शकतो. आम्ही एकत्र आहोत आणि चांगल्या चर्चाही होत आहेत. निश्चितपणे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. सर्व खेळाडू रात्री एकत्रच होते.’ ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रेव्हिस हेडने चांगली फलंदाजी केली. या व्यतिरिक्त सर्वकाही फिस्कटल्याचं दिसलं. इतकंच काय तर स्टीव्ह स्मिथने ओपनिंग सोडल्याने आधीच चर्चा रंगली होती. त्यात आता आणखी भर पडली आहे.
ट्रेव्हिस हेडने पुढे सांगितलं की, ‘पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर खूपच टीका होत आहे. त्यामुळे एडिलेडमध्ये पिंक बॉलचा सामना करताना आम्हाला मालिकेत बरोबरी साधायची आहे. एडिलेडवर आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी 11 सामन्यात विजय मिळवला आहे.’ दुसरीकडे, भारताने मागच्या वेळेस एडिलेडवर पिंक बॉल कसोटी खेळला होता. टीम दुसऱ्या डावात 36 धावांवर ऑलआऊट झाली होती. 2020-21 मध्ये भारताने हा सामना 8 विकेटने गमवला होता.