प्रशिक्षक गौतम गंभीरसोबतचा आयपीएलमधील अनुभव आवेश खानने केला शेअर, म्हणाला…

| Updated on: Jul 13, 2024 | 11:02 PM

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी विराजमान होण्यापू्र्वी गौतम गंभीर आयपीएलमध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेत होता. लखनौ सुपर जायंट्सनंतर कोलकाता नाईट रायडर्सची सूत्र हाती घेतली. लखनौ सुपर जायंट्ससोबत गंभीर असताना आवेश खानला त्याच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली. यावेळी विराट गंभीरमधील वाद असो की आणखी काही..आवेश खान त्याचा साक्षीदार राहिला आहे.

प्रशिक्षक गौतम गंभीरसोबतचा आयपीएलमधील अनुभव आवेश खानने केला शेअर, म्हणाला...
Follow us on

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र गौतम गंभीरने हाती घेतली आहे. गौतम गंभीर आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याचं वागणं पाहून अनेकांनी धास्ती घेतली आहे. गौतम गंभीर श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियासोबत असणार आहे. यापूर्वी गौतम गंभीरने लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससोबत मार्गदर्शक म्हणून कामं केलं आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या पर्वात केकेआरने जेतेपदावर नावंही कोरलं. आता टीम इंडियाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा वाढल्या आहेत. दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या आवेश खानने गौतम गंभीरसोबतचा अनुभव शेअर केला आहे. गौतम गंभीर आणि आवेश खान लखनौ सुपर जायंट्समध्ये एकत्र होते. त्यामुळे त्याच्याबाबत आवेश खानला बरंच काही माहिती आहे. कारण त्याच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे खेळण्याची संधी त्याला आयपीएलमध्ये मिळाली. आवेश खानने गौतम गंभीरबाबत सांगितलं की, गंभीरचं एकमेव लक्ष्य असतं ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणं.

“मी गंभीरकडून जे काही शिकलो आहे ते एका मानसिकतेबाबत आहे. आपल्याला कायम विरोधकांपेक्षा चांगली कामगिरी करायची आहे. आपल्याला शंभर टक्के योगदान द्यायला हवं. संघ बैठकीत असो की समोरासमोर आलो आहोत. तो खूप कमी बोलतो, पण जे काही करायचं आहे त्याबाबत आपलं स्पष्ट मत ठेवतो. तो तुमच्यासमोर काहीतरी आव्हान ठेवतो आणि खेळाडूंना भूमिका सोपवतो. तो कायम टीम कोच राहिला आहे. तो कोणत्याही परिस्थितीत जिंकू इच्छितो आणि प्रत्येक खेळाडूने आपलं शंभर टक्के योगदान द्यावं अशी भूमिका असते.”, असं आवेश खानने गौतम गंभीरबाबत सांगितलं.

गौतम गंभीरचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ श्रीलंका दौऱ्यापासून सुरु होणार आहे.  या दौऱ्यात तीन टी20 सामन्यांची आणि तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेपूर्वी कोचिंग स्टाफबाबतही बरंच काही सुरु आहे. तर संघ निवडीचं मोठं आव्हान यावेळी असणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गौतम गंभीरची सुरुवात गुंतागुंतीतून होणार असं दिसत आहे.