बांगलादेशविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमधून या खेळाडूचा पत्ता कापला जाणार! रोहित शर्माला कोणाला देणार संधी?

| Updated on: Sep 16, 2024 | 6:44 PM

भारत आणि बांग्लादेश कसोटी मालिकेकडे क्रिकेटविश्वाचं लक्ष लागून आहे. बांगलादेशने पाकिस्तानला 2-0 ने पराभूत केल्याने या मालिकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे ही कसोटी मालिका भारतासाठी सोपी नसेल यात काहीच शंका नाही. असं असताना रोहित शर्मा कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात याबाबतची खलबतं सुरु झाली आहेत.

बांगलादेशविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमधून या खेळाडूचा पत्ता कापला जाणार! रोहित शर्माला कोणाला देणार संधी?
Image Credit source: BCCI
Follow us on

भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यानंतर जवळपास दीड महिना आराम केला. आता भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी भारताने चेन्नईच्या चेपॉक मैदानात सराव देखील सुरु केला आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा संघ भारतात आला असून त्यांनीही इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर बांगलादेशचा संघ फॉर्मात आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांना या मालिकेची धास्ती लागून आहे. कारण या सामन्यातील निकाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीवर प्रभाव टाकणार आहे. असं सर्व आकडेमोड असताना भारतीय संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार याची खलबतं आतापासूनच सुरुवात झाली आहे. लाल माती की काळ्या मातीची खेळपट्टी यावरूनही चर्चा सुरु आहे. अशा भारतीय संघाचा जोरदार सराव सुरु आहे आणि यातूनच प्लेइंग इलेव्हनबाबत काही संकेत मिळत आहेत. कर्णधार रोहित शर्मा 19 सप्टेंबरला नाणेफेकीचा कौल होताच या 11 खेळाडूंना प्राधान्य देईल अशी चर्चा सुरु झाली आहे.

सराव शिबिरात विराट कोहली पहिल्यांदा नेटमध्ये बॅटिंगसाठी उतरला. त्याच्या बाजूच्या नेटमध्ये यशस्वी जयस्वाल कसून सराव करत होता. या दोघांनी जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांच्या गोलंदाजीचा सामना केला. या दोघांनंतर कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल आणि सरफराज खान फलंदाजीसाठी मैदानात उतरले. सरफराज खान दुलीप ट्रॉफीतील दुसऱ्या सामन्यानंतर टीम इंडियासोबत सराव शिबिरात रूजू झाला आहे. रोहित शर्माने फिरकीपटूंचा सामना केला. कारण श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ फिरकीचा सामना करताना त्रासलेला दिसला. दुसरीकडे, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराजने थ्रोडाउनसमोर फलंदाजी केली.

चेन्नईच्या खेळपट्टीचा विचार केला तर ही फिरकीपटूंना मदत करणारी आहे. त्यामुळे तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह रोहित शर्मा मैदानात उतरू शकतो. यात वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असेल. फिरकीची जबाबदारी आर अश्विन आणि रवींद्र जडेजाकडे असेल. आता कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. पण अक्षर पटेलला बेंचवर बसण्याची वेळ येऊ शकते. दुसरा कसोटी सामना कानपूरला होणार आहे. हे कुलदीप यादवचं होमग्राउंड आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावं लागू शकतं.