बाबर आझमला आता मैदानात तग धरून खेळणं कठीण झाल्याचं दिसत आहे. क्रिकेटमध्ये चढउतार येत असतात. पण गेल्या काही वर्षात बाबर आझमच्या फलंदाजीतून धावा काही आलेल्या नाही. बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करेल अशी आशा होती. मात्र तिथेही बाबर आझम फेल ठरला आहे. घरच्या मैदानावर बाबर आझम मोठी खेळी करू शकत नसल्याचं पाहून क्रीडारसिकांना चिंता वाटू लागली आहे. बाबर आझमची निराशाजनक खेळी पाहून त्याला संघातून डावललं जाण्याची भीती क्रीडारसिकांना वाटत आहे. बाबर आझम पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शून्यावर, तर दुसऱ्या डावात 22 धावा करून बाद झाला होता. हा सामना पाकिस्तानने गमावला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण 31 धावा करून तंबूत परतला आहे. त्यामुळे बाबर आझमला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
अब्दुल्ला शफीकच्या माध्यमातून पाकिस्तानला पहिला धक्का बसला. तेव्हा संघाचं आणि त्याचही खातं खुललं नव्हतं. त्यानंतर सइम अयुब आणि शान मसूद यांनी डाव सावरला आणि दुसऱ्या गड्यासाठी 107 धावांची भागीदारी केली. शान मसूद मेहिदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि बाबर आझम मैदानात उतरला. सइम आणि बाबर यांची 15 धावांची भागीदारी होत नाही तोच सइम अयुब 58 धावांवर यष्टीचीत झाला. त्यामुळे बाबर आझमकडून बऱ्याच अपेक्षा होता. आता तरी चांगली खेळी करेल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. 77 चेंडूचा सामना करत 2 चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या आणि शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
दुर्दैवाने पाकिस्तानला दुसरा कसोटी सामना गमवण्याची किंवा ड्रॉ होण्याची वेळ आली तर सर्वच कठीण होईल. कारण मालिका गमवल्याने सर्वच स्तरातून टीका होईल. त्यामुळे बाबर आझमला फटका बसू शकतो. बाबर आझमला पाकिस्तान संघातून डावललं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाबर आझमच्या भवितव्यावर टांगती तलवार आहे. त्यात संघात दुफळी असल्याने त्याचा फटका बसणार हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर पाकिस्तान संघात उलथापालथ होणार यात शंका नाही.