टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी राहिली. साखळी फेरीतच पाकिस्तान संघाला गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे पाकिस्तानी क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिग्गज खेळाडूंना धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. पीसीबी सर्व खेळाडूंना एका वर्षात दोन विदेशी लीग खेळण्याची परवानगी देते. पण पीसीबीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, विकेटकीपर मोहम्मद रिझवान आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांना विदेशी लीग खेळण्यासाठी अजूनही परवानगी दिलेली नाही. या तिघांना ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं नाही. ग्लोबल टी20 कॅनडा लीग 25 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत आयोजित केली आहे. तर बांगलादेशविरुद्ध टेस्ट मालिका 19 ऑगस्टच्या जवळपास सुरु होणार आहे. त्यामुळे पीसीबी या दिग्गज खेळाडूंना अडकवून ठेवत असल्याचं दिलं आहे.
पीसीबीने 4 जुलै ते 28 जुलै दरम्यान होणाऱ्या युएसए मेजर लीगसाठी अबरार अहमद,हारिस रऊफ आणि जमान खान यांना ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. तर लंका प्रीमियर लीगसाठी मोहम्मद हारिस, मोहम्मद हसनैन, सलमान आगा, शादाब खान यांना परवानगी दिली आहे. तर कॅरेबियन लीगमध्ये फखर जमान खेळणार आहे. त्याचबरोबर हंड्रेडसाठी उसामा मीर आणि काउंटी क्रिकेटसाठी मोहम्मद आमिरला परवानगी दिली आहे.
पीसीबीने मंगळवारी वेगवेगळ्या लीगसाठी 12 खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. पण बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना अडकवून ठेवलं आहे. हे तिघंही सेंट्र कॉन्ट्रॅक्टच्या टॉप कॅटेगरीत येतात. पीसीबीच्या एका अधिकाऱ्यांने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, पीसीबी ग्लोबल लीगबाबत संभ्रमात आहे. यासाठी आयोजक आणि आयसीसीकडून काही माहिती मागवली आहे. त्यामुळे एनओसी देण्यात दिरंगाई झाल्याचं बोललं जात आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानात होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भारत पाकिस्तान सामना 1 मार्चला असेल असंही सांगून टाकलं आहे. आता भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं आहे.