चिटगाव | बांगलादेशने टी 20 वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडवर पहिल्या टी 20 क्रिकेट सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 157 धावांचं आव्हान बांगलादेशने 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बांगलादेशने 2 ओव्हरआधीच हे लक्ष्य गाठलं. बांगलादेशकडून नजमुल शांतो याने सर्वाधिक अर्धशतकी खेळी केली. तर कॅप्टन शाकिब अल हसन आणि आफिफ हुसैन या जोडीने बांगलादेशला विजयापर्यंत पोहचवलं. इंग्लंडकडून मोईन अली, मार्क वूड, आदिल रशीद आणि जोफ्रा आर्चर या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. बांगलादेशने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या बांगलादेशची उत्तम सुरुवात राहिली. बांगलादेशने लिटॉन दास आणि रॉनी तालुकदार या दोघांनी 33 धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर तालुकदार 21 धावांवर आऊट झाला त्यानंतर धावसंख्येत 10 धावांच्या वाढीनंतर बांगलादेशला 43 धावांवर दुसरा धक्का बसला. लिटॉन दास 12 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे 2 बाद 43 अशी बांगलादेशची स्थिती झाली.
मात्र यानंतर नाजमुल आणि तोहीद या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 65 धावांची महत्वपूर्ण आणि निर्णायक पार्टनरशीप केली. मात्र 108 धावांवर बांगलादेशला तिसरा झटका बसला. तोहिदने 24 रन्स केल्या. यानंतर 112 धावांवर नाजमुल 51 रन्स करुन आऊट झाला.
नाजमुलने 30 बॉलमध्ये 8 चौकारांच्या मदतीने ही अर्धशतकी खेळी केली. नाजमुलकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र तो आऊट झाला. यानंतर कॅप्टन शाकिब आणि आफिफ या जोडीने 46 धावांनी नाबाद विजयी भागीदारी केली. शाकिबने 34 आणि आफिफने 15 नाबाद धावा केल्या.
दरम्यान आता या मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. इंग्लंडसाठी दुसरा सामना हा करो या मरो असा असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कोण जिंकतं याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | शाकीब अल हसन (कर्णधार), रॉनी तालुकदार, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो, शमीम हुसेन, अफिफ हुसैन, तौहीद ह्रदोय, तस्किन अहमद, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि हसन महमूद.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन/विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, डेविड मलान, बेन डकेट, मोईन अली, सॅम कुरॅन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड.