वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. तसं पाहिलं तर दोन्ही संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. दरम्यान, बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण बांगलादेशचा संपूर्ण संघ हा 106 धावांवर ऑलआऊट झाला. य महमुदुल हसन जॉयने सर्वाधिक 30 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. शदमन इस्लामला तर आपलं खातंही खोलता आलं नाही. बांगलादेशचे पाच फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. दक्षिण अफ्रिकेकडून कगिसो रबाडाने 3, वियान मुल्डरने 3, केशव महाराजने 3 आणि डेन पीड्टने 1 गडी बाद केला.
बांगलादेशने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा डावही गडगडला. कर्णधार एडन मार्करम हा फक्त 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर टॉनी दी झोर्जी आणि ट्रिस्टन स्टब्सने डाव सावरला. पण दोघं मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. टॉनीने 30, तर ट्रिस्टन स्टब्सने 23 धावा केल्या. डेविड बेडिंगम 11 धावा, तर रायन रिकेल्टन 27 धावा करून बाद झाले. तर मॅथ्यू ब्रीज्झ्केला खातंही खोलता आलं नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकेने 6 गडी बाद 140 धावा केल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेकडे 34 धावांची आघाडी आहे. कायल वेरेयने 18 आणि वियान मुल्डर 17 धावांवर खेळत आहेत.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, जाकेर अली, नईम हसन, तैजुल इस्लाम, हसन महमूद.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): टोनी डी झॉर्झी, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, रायन रिकेल्टन, मॅथ्यू ब्रेट्झके, काइल वेरेन (विकेटकीपर), वायन मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, डेन पीड्ट