ढाका | वूमन्स क्रिकेट टीम इंडिया सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने बांगलादेशला टी 20 मालिकेत पराभूत करत शानदार सुरुवात केली. त्यानंतर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. बांगलादेशने टीम इंडियावर मात करत पहिलावहिला विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियावर बांगालदेशकडून पराभूत होण्याची नामूष्की ओढावली. इतकंच नाही, तर बांगलादेशने विजयासह 1-0 ने आघाडी घेतल्याने टीम इंडियासाठी दुसरा सामना हा प्रतिष्ठेचा होता. टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत जिंकणं भाग होतं.
टीम इंडियाकडून मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने ऑलराऊंड कामगिरी करत टीम इंडियाला ‘करो या मरो’ शानदार विजय मिळवून दिला. टीम इंडियाने यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यामुळे आता मालिका रंगतदार स्थितीत पोहचली आहे. या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासह मालिका जिंकण्याची दोन्ही संघांना संधी आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या तिसऱ्या सामन्याबाबत आपण सर्वकाही जाणून घेऊयात.
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा सामना हा शनिवारी 22 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील हा अंतिम सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका इथे आयोजित करण्यात आला आहे.
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 9 वाजता टॉस होईल.
या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग टीव्हीवर कुठेच होणार नाही. मात्र डीजीटल स्ट्रीमिंग अर्थात हा सामना मोबाईलवर फॅनकोडवर पाहता येईल.
वूमन्स टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), स्मृती मंधाना, प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, देविका वैद्य, मेघना सिंग, पूजा वस्त्राकार, शफाली वर्मा, अंजली सरवानी, मोनिका पटेल, बारेड्डी अनुशा, राशी कनोजिया आणि उमा छेत्री.
वूमन्स बांगलादेश क्रिकेट टीम | निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), मुर्शिदा खातून, शर्मीन अख्तर, फरगाना हक, लता मंडल, रितू मोनी, राबेया खान, नाहिदा अक्टर, फहिमा खातून, सुलताना खातून, मारुफा अक्टर, दिशा बिस्वास, शोर्ना अक्टर, शांजिदा अक्टर, शोभना मोस्तरी, शमीमा सुलताना आणि सलमा खातून.