आगामी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी अखेर बांगलादेश क्रिकेटने टीमची घोषणा केली आहे. बांगलादेश क्रिकेट आणि आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. बांगलादेशच्या वर्ल्ड कपसाठीच्या मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर राखीव खेळाडू म्हणून दोघांना संधी देण्यात आली आहे. बांगलादेशचं 25 वर्षांचा युवा खेळाडू नेतृत्व करणार आहे. तर दुखापतग्रस्त खेळाडूकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच बांगलादेशचा स्टार ऑलराउंडर हा सलग नववा वर्ल्ड खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मंगळवारी 14 मे रोजी संघ जाहीर केला. त्यानुसार 25 वर्षीय युवा नजमूल हुसैन शांतो याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच तस्कीन अहमद याला दुखापतीनंतरही संघात स्थान देण्यात आलंय. इतकंच नाही, तर त्याला उपकर्णधार करण्यात आलंय. तसेच अनुभवी शाकिब अल हसन याचीही संघात निवड करण्यात आलीय. शाकिबचा हा सलग आणि एकूण नववा टी 20 वर्ल्ड कप असणार आहे. शाकिब 2007 च्या पहिल्या टी20 वर्ल्ड कपपासून ते गत वर्ल्ड कपपर्यंतच्या प्रत्येक स्पर्धेत सहभागी होता.
दरम्यान वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार बांगलादेश टीम डी ग्रुपमध्ये आहे. बांगलादेशसह या ग्रुपमध्ये नेदरलंड, श्रीलंका, नेपाळ आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होत आहे. तर बांगलादेश 5 दिवसांनंतर आपला पहिला सामना खेळणार आहे.
वर्ल्ड कपसाठी असा आहे बांगलादेश संघ
Bangladesh Squad | ICC Men’s T20 World Cup West Indies & USA 2024 🫶 🇧🇩 #BCB #Cricket #T20WorldCup 2024 pic.twitter.com/GKJ89MzeLL
— Bangladesh Cricket (@BCBtigers) May 14, 2024
टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), तस्कीन अहमद (उपकर्णधार), लिटॉन दास, सौम्य सरकार, तंजिद हसन, शाकिब अल हसन, तॉहिद हृदोय, महमूदुल्लाह, जाकेर अली, तनवीर इस्लाम, मेहदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, शॉरिफुल इस्लाम आणि तंजिम हसन.
राखीव खेळाडू : हसन महमूद आणि अफीफ हुसैन.