मुंबई : बांगलादेशनं अनेकदा मोठ्या स्पर्धांमध्ये दिग्गज संघांचं स्वप्न भंग केलं आहे. जेतेपदासाठी पोहोचणं शक्य नसलं तरी एखाद्या संघाला चीतपट देण्याची क्षमता बांगलादेश संघात आहे. गेल्या काही वर्षात बांगलादेश क्रिकेटमध्ये बरेच सकारात्मक बदल पाहायला मिळाले आहेत. बांगलादेशनं आशिया कप स्पर्धेतही भारताला पराभवाचं पाणी पाजलं आहे, हे देखील विसरून चालणार नाही. दुसरीकडे, वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यात बांगलादेशनं चुणूक दाखवून दिली आहे. श्रीलंकेचा 7 गडी आणइ 48 चेंडू राखून पराभव केला आहे. त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. श्रीलंकेनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं सर्वबाद 263 धावा केल्या आणि विजयासाठी 264 धावांचं आव्हान दिलं.
श्रीलंकेनं विजयासाठी दिलेल्या विजयी धावांचा पाठलाग करणयासाठी तन्झिद हसन आणि लिट्टन दास ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने श्रीलंकन गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 131 धावांची भागीदारी केली. लिट्टन दास 61 धावांवर बाद झाल्यानंतर तन्झिदने मोर्चा सांभाळला. त्याने 88 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 84 धावा केल्या. त्याला मेहदी हसनची उत्तम साथ लाभली. फलंदाजी आलेला तोहिद हृदय काही खास करू शकला नाही आणि शून्यावर बाद झाला. त्यानंतर मुश्फिकुर रहिम आणि मेहदी हसन यांनी बांगलादेशला विजय मिळवून दिला. श्रीलंकेच्या गोलंदाजीला हवी तशी धार दिसली नाही.
बांगलादेश : शाकिब अल हसन (कर्णधार ), लिटन दास, तन्झीद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (उपकर्णधार), तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान , हसन महमूद , शोरीफुल इस्लाम , तन्झीम हसन साकीब.
श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, महिष तिक्षना, दुनिथ वेलालगे, महिष तिक्षना, दुनिथ वेलालगे, राजकुमार राजू, दिलशान.मदुशंका, दुशान हेमंथा.