ढाका | बांगलादेशचा स्टार खेळाडू शाकिब अल हसन हा क्रिकेट विश्वातील आघाडीचा ऑलराउंडर आहे. शाकिब आयसीसी टी 20 आणि वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. तर टेस्ट ऑलराउंड खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावरुन शाकिब काय तोडीचा प्लेअर आहे, याचा अदांज बांधता येईल. शाकिब असं असलं तरी तो ऑन फिल्ड आणि ऑफ फिल्ड कायम वादाच्या भोवऱ्यात असतो. मध्यंतरी शाकिब अंपयारसोबत भिडला होता. तर एकदा त्याने स्टंप उखाडला होता. तो वाद शमतो न शमतो त्यात आता शाकिब पुन्हा एकदा वादात सापडला आहे.
शाकिबचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत शाकिब त्याच्या चाहत्याला टोपीने मारताना दिसतोय. शाकिबच्या या कृतीचं सोशल मीडियावर निषेध केला जात आहे.
शाकिब एका प्रमोशनल कार्यक्रमासाठी चटोग्राम इखे गेला होता. अर्थात आता इतका मोठा स्टार खेळाडू येणार म्हटल्यावर चाहत्यांची गर्दी होणं साहजिक आहे. किमान मैदानात नाही, तर इथेतर शाकिबची एक झलक पाहता येईल, यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. शाकिबला या गर्दीतूनच वाट काढावी लागली.
शाकिब त्या गर्दीतून वाट काढत पुढे चालला होता. तेवढ्यातच त्याच्या एका चाहत्याने शाकिबची टोपी हिसकावून घेतली. मग काय, शाकिबची सटकली. शाकिबने त्या चाहत्याच्या हातातून टोपी खेचली आणि त्या टोपीनेच त्याला दोन फटके दिले.
शाकिब अल हसन आक्रमक
Nah i love shakib al hasan sometimes you just gotta beat ‘em up pic.twitter.com/JDzA5q58TR
— adi ✨?? (@notanotheradi) March 10, 2023
दरम्यान बांगालदेश विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटीनंतर 3 सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. बांगलादेशने कसोटी मालिका गमावल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडचा पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. यासह बांगलादेशने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यातही शाकिबने धमाका केला.
कॅप्टनच्या भूमिकेत असलेल्या शाकिबने 1 विकेट घेतली. तसेच बॅटिंग करताना त्याने नाबाद 24 बॉलमध्ये 34 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 फोर ठोकले होते. दरम्यान या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा 12 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
हा सामना जिंकून बांगलादेशला सीरिज जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडसाठी हा करो या मरोचा सामना असणार आहे. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी इंग्लंडला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. त्यामुळे या दोन्ही संघांपैकी कोण बाजी मारतं, याकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.