नवी दिल्ली | वर्ल्ड कप 2023 मधील 38 व्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर 3 विकेट्सने विजय मिळवला. बांगलादेशचा हा या स्पर्धेतील एकूण दुसरा विजय ठरला. या सामन्यापेक्षा सर्वाधिक चर्चा रंगली ती टाईम आऊटच्या निमित्ताने झालेल्या वादामुळे. श्रीलंकाच्या बॅटिंगदरम्यान बांगलादेश कॅप्टन शाकिब अल हसन याने अँजेलो मॅथ्यूज विरुद्ध टाईम आऊटसाठी अपील केली. अंपायरने शाकिबच्या अपीलवर अँजेलोला बाद घोषित केलं. शाकिबने विजयानंतर या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अपील करताना डोक्यात काय सुरु होतं, हे शाकिबने सांगितलं.
“अँजेलो मॅथ्यूजला आऊट करण्यासाठी अपीलबाबत माझ्याच सहकाऱ्याने मला येऊन कल्पना दिली की आपण दाद मागितली तर त्याला बाद देण्यात येईल. त्यानुसार मी अंपायरकडे गेलो. मी अपील केली. तु या अपीलबाबत गंभीर आहेस का, असं अंपायरने मला विचारलं. नियमांनुसार आऊट असेल तर द्यावं, असं मी मी अंपायरला म्हटलं. आम्ही सामना खेळतोय. टीमला जिंकवण्यासाठी जे करायचंय ते मी करेन. मग ते चूक असो वा बरोबर. आता याबाबत चर्चा होतच राहतील. पण मी तेच केलं जे नियमांमध्ये आहे”, अशी प्रतिक्रिया शाकिबने दिली.
श्रीलंकेच्या बॅटिंगदरम्यान 25 व्या ओव्हरदरम्यान बॅटिंगसाठी आला. अँजेलोने स्ट्राईक एंडवर येत हेल्मेट डोक्यात घातला आणि घट्ट करायला लागला. या गरम्यान हेल्मेटची स्ट्रीप तुटली. त्यामुळे अँजेलोने दुसरा हेल्मेट मागवला. पण तितक्यात शाकिबने टाईम आऊटची अपील केली. अंपायरनेही नियमांनुसार अँजेलोला आऊट असल्याचं जाहीर केलं. अँजेलोला हा निर्णय पटला नाही. त्याने या निर्णयाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली. मात्र नियमानुसार अँजेलोला ही चूक भोवली. यावरुन आता चांगलाच वाद पेटलाय.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शकिब अल हसन (कॅप्टन), तन्झिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, तॉहिद हृदोय, मेहदी हसन मिराझ, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद आणि शोरीफुल इस्लाम.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.