टीम इंडिया-बांग्लादेश यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा 27 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडिया दुसरा सामना जिंकून बांगलादेशला क्लिन स्वीप देण्याच्या मानस असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेश दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र दुसऱ्या सामन्याआधी बांगलादेशचं टेन्शन वाढलं आहे. बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन कानपूर कसोटीला मुकण्याची शक्यता आहे.
शाकिब अल हसन टीम इंडिया विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. शाकिबला डाव्या हाताच्या बोटाला वर्ल्ड कप दरम्यान दुखापत झाली होती. शाकिबला टीम इंडिया विरूद्धच्या चेन्नईतील पहिल्या कसोटीत या दुखापतीमुळे त्रास जाणवला. तसेच शाकिबला खांद्याच्या दुखापतीचाही त्रास आहे. त्यामुळे शाकिबवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. तसेच शाकिबच्या दुखापतीबाबत बांग्लादेश निवड समितीचे निवडकर्ता हन्नान सरकार यांनी दुखापतीबाबत माहिती दिली आहे.
शाकिब आमचा सर्वोत्तम खेळाडू आहे. शाकिब प्लेइंग ईलेव्हनमध्ये असल्यावर संघात संतुलन ठेवणं सोपं ठरतं. शाकिबने याआधी ज्याप्रकारे बॅटिंग केलीय, त्या तुलनेत त्याच्या फलंदाजीच्या शैलीत आत्मविश्वास दिसून येतो. शाकिब सहज खेळला. तो दबावाच्या स्थितीला सामोरा गेला. त्याला मोठी खेळी करता आली नाही. मात्र शाकिब संघात संतुलन साधण्यात निर्णायक भूमिका बजावलीय”, असं सरकार म्हणाले. सरकार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दरम्यान शाकिबला पहिल्या कसोटी टीम इंडिया विरुद्ध दोन्ही डावात एकूण 21 ओव्हर टाकल्या. मात्र शाकिबला एकही विकेट मिळाली नाही. तर शाकिबने दोन्ही डावात अनुक्रमे 32 आणि 25 धावा केल्या. बांगलादेशला पहिल्या सामन्यात चौथ्या दिवशी 280 धावांच्या फरकाने पराभवाला सामोरं जावं लागलं.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद नाहिद राणा, महमुदुल हसन जॉय, जाकेर अली, खालेद अहमद, तैजुल इस्लाम आणि नईम हसन.