मुंबई | आशिया कप स्पर्धेला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. एसीसीनेही काही दिवसांपूर्वी आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार आशिया कपला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 17 सप्टेंबरला फायनल होणार आहे. यंदा आशिया कप 50 ओव्हर म्हणजेच वनडे फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. टीमच्या कॅप्टनने आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना झटका लागलाय.
आशिया कप स्पर्धेसाठी एकूण 6 संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे 6 संघ एका ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. हे सर्वच्या सर्व संघ आशिया कपसाठी जोरदार सराव करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशला मोठा झटका लागलाय. बांगलादेशचा अनुभवी फलंदाज तमीम इक्बाल याने वनडे कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही, तर पाठीच्या दुखापतीमुळे तमीम आशिया कप स्पर्धेतून बाहेर झालाय.
तमीम सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरतोय. तमीम नुकताच या पाठीच्या दुखापतीसाठी इंग्लंडला गेला होता. मात्र तमीम अजूनही पुर्णपणे या पाठीच्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळेच तमीमने माघार घेतली आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेश अफगाणिस्तान आणि टीम इंडिया विरुद्ध मालिका खेळली होती. या दोन्ही मालिकेत तमीम इक्बाल उपलब्ध नव्हता. त्यामुळे लिटॉन दास याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
दरम्यान तमीमने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निर्णयानंतर दुसऱ्या दिवशी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी तमीमला भेटीसाठी बोलावलं. या भेटीनंतर तमीमने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता.
तमीम इक्बाल याने बांगलादेशचं 70 कसोटी, 241 वनडे आणि 78 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. तमीमने 70 कसोटींमधील 134 डावांमध्ये 1 द्विशतक, 10 शतक आणि 31 अर्धशतकांच्या मदतीने 5 हजार 134 धावा केल्या आहेत.
तर तमीमच्या नावावर वनडेत बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. तमीमने 241 एकदिवसीय सामन्यात 56 अर्धशतक आणि 14 शतकांच्या मदतीने 10 हजार 584 धावा केल्या आहेत. तर क्रिकेटमधील सर्वात लहान फॉर्मेट अर्थात टी क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 7 अर्धशतकांसह 1 हजार 758 धावा केल्या आहेत. तमीमच्या नावावर कसोटी, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करण्याचा अनोखा विक्रम आहे.