मुंबई | यंदाचं वर्षात क्रिकेट चाहत्यांना टी 20 वर्ल्ड कप 2024 चा थरार अनुभवता येणार आहे. या टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन हे यूएसए आणि विंडिजमध्ये 1 ते 29 जून दरम्यान करण्यात आलं आहे. त्याआधी टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये सुरुवात होत आहे. त्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. बीसीसीआयने भारतातील प्रसिद्ध टी 20 लीग स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेतील पहिलाच सामना हा मुंबई इंडियन्सचा आहे.
बीसीसीआयने डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमिअर लीग 2024 चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. स्पर्धेचं आयोजन हे 23 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा मुबंई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात होणार आहे. तर साखळी फेरीतील अखेरचा सामना 13 मार्च रोजी होईल. त्यानंतर 15 मार्च रोजी एलिमिनेटर आणि 17 तारखेला अंतिम सामना पार पडेल.
या स्पर्धेत एकूण 5 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा समावेश आहे. स्पर्धेत एकूण 24 दिवसात 22 सामने पार पडतील. या स्पर्धेचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी आणि नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सर्व सामन्यांना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.
बीसीसीआयकडून अखेर वेळापत्रक जाहीर
The complete fixtures for #TATAWPL are here! 🙌
Check it out 🔽 https://t.co/sT08tnmQOK
— BCCI (@BCCI) January 24, 2024
स्पर्धेत प्रत्येक टीम इतर संघाविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी असलेली टीम थेट फायनलसाठी पात्र ठरेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठी एलिमिनेटर सामना पार पडेल. एलिमिनेटर जिंकणारी टीम फायनलसाठी क्वालिफाय करेल. त्यानंतर 2 संघ निश्चित होतील. फायनलनंतर विजेता टीम निश्चित होईल.