साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे सध्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेकडे लागून आहे. या स्पर्धेत आतापर्यंत क्रिकेट चाहत्यांना 2 सुपर ओव्हर पाहायला मिळाले आहेत. सुरुवातीच्याच काही सामन्यांमध्ये स्पर्धेत रंगत पाहायला मिळाली आहे. आता 9 जून रोजी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलंय. अशात दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आता थेट टॉस हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात या निर्णयाबाबत अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
बीसीसीआयने गुरुवारी 6 जून रोजी देशांतर्गत स्पर्धा 2024-2025 चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने एकूण 10 महत्त्वाच्या स्पर्धांचं वेळापत्रक जाहीर केलंय. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं सर्वात आधी 5 सप्टेंबरपासून अनंतपूर येथे सुरुवात होणार आहे. तसेच बीसीसीआयने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धेत सीके नायडू ट्रॉफीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेत आता यापुढे टॉस होणार नसल्याचा ऐतिहासिक निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे पाहुण्या संघाला बॅटिंग करायची की फिल्डिंग याचा निर्णय घेण्याची मुभा असणार आहे. त्यामुळे यजमान संघावर हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया उमटतेय. त्यामुळे बीसीसीआय या निर्णयाबाबत काय भूमिका घेते, याकडेही लक्ष असणार आहे.
बीसीसीआयने अनेक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार बीसीसीआयने खेळाडूंच्या आरोग्याला प्राथमिकता दिली आहे. खेळाडूंना पर्याप्त वेळ मिळावा आणि कामगिरीत चांगला फरक पडावा या हेतून बीसीसीआयने 2 सामन्यांमध्ये ठराविक अंतर ठेवलं आहे.
तसेच आता प्रतिष्ठेची असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धा 2 टप्प्यांमध्ये खेळवण्यात येणार आहे. ज्यामध्ये लिमिटेड ओव्हर स्पर्धेसाठी 1 विंडो ठेवण्यात आली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील महाअंतिम सामना हा मे 2025 मध्ये पार पडणार आहे.
बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर
🚨 News 🚨
BCCI announces domestic fixtures for home season 2024-25
Read 🔽https://t.co/iMcwnUi78L@IDFCFIRSTBank pic.twitter.com/p6TLTGGzm0
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 6, 2024
तसेच सीके नायडू अंडर 23 स्पर्धेत एक नव्या अंक प्रणालीचा प्रयोग केला जाणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, यंदा स्पर्धेत सामन्यातील पहिल्या डावात बॅटिंग आणि बॉलिंगसाठी पॉइंट्स दिले जातील. तसेच पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या किंवा विजयासाठी 2 पॉइंट्स दिले जातील. बीसीसीआयच्या या निर्णयांमुळे देशांतर्गत स्पर्धेत नक्कीच बदल पाहायला मिळतील.