मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाचा थरार एकाबाजूला रंगतोय. या मोसमातील पहिला टप्पा पूर्ण झालाय. बीसीसीआय कडून काही दिवसांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी 15 सदस्यीय भारतीय पुरुष संघ जाहीर करण्यात आला. यामध्ये अजिंक्य रहाणे याची एन्ट्री झाली. यानंतर आता बीसीसीआयने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंचं वार्षिक करार जाहीर केला आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने वूमन्स क्रिकेट टीमचं वार्षिक करार जाहीर केला आहे. बीसीसीआय कडून या यादीत एकूण 17 जणांचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने या एकूण 17 खेळाडूंचा ए, बी आणि सी अशा 3 गटात विभागलं आहे. त्यानुसार पहिल्या ए श्रेणीत एकूण 3 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. बी श्रेणीत 5 खेळाडू आहेत. तर सी श्रेणीत एकूण 9 महिला क्रिकेटपटू आहेत.
बीसीसीआय वूमन्स क्रिकेट टीम वार्षिक करार
? NEWS ?: BCCI announces annual player retainership 2022-23 – Team India (Senior Women). #TeamIndia
More Details ?https://t.co/C4wPOfi2EF
— BCCI Women (@BCCIWomen) April 27, 2023
बीसीसीआयकडून मार्च महिन्यात मेन्स टीम इंडियाच्या खेळाडूंचंही वार्षिक करार जाहीर केला होता. यामध्ये ए प्लस, ए, बी आणि सी अशा एकूण 4 गटात या खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार गटनिहाय अनुक्रमे 7, 5, 3 आणि 1 कोटी अशी रक्कम जाहीर करण्यात आली. मात्र पुरुषांच्या तुलनेत महिलांनी देण्यात येणारी रक्कम अधिकच तोकडी आणि नाहीच्या बरोबर आहे, असं ही रक्कम पाहिल्यावर तुम्ही नक्कीच म्हणाल.
बीसीसीआय महिला टीमच्या ए श्रेणीतील खेळाडूंना 50 लाख, ब श्रेणीतील खेळाडूंना 30 लाख आणि क श्रेणीत असणाऱ्यांना 10 लाख रुपये मानधन म्हणून देणार आहे. हा करार 2022-23 या कालावधीसाठी आहे.
बीसीसीआयने अ श्रेणीत एकूण 3 खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर, सांगलीकर स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा या तिघांचा समावेश आहे.
ब श्रेणीत अ च्या तुलनेत 2 अधिक खेळाडूंचा म्हणजेच 5 क्रिकेटपटूंचा समावेश आहे. यात रेणूका ठाकूर, भांडूपकर जेमिमाह रॉड्रिग्जस, शफाली वर्मा, रिचा घोष आणि राजेश्वरी गायकवाड हे आहेत.
तिसऱ्या आणि शेवटच्या क श्रेणीत सर्वाधिक 9 खेळाडू आहेत. यामध्ये मेघना सिंह, देविका वैद्य, सबनेनी मेघना, अंजली सर्वनी, पूजा वस्त्रकर, स्नेह राणा, राधा यादव, हर्लीन देओल आणि यास्तिका भाटीया आहेत.
दरम्यान या वार्षिक करारात काहींचे पंख छाटण्यात आलेत. काही जणांची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. त्यामुळे कही खुशी कही गम असं वातावरण आहे. राजेश्वर गायकवाड ही आतापर्यंत अ श्रेणीत होती. मात्र तिचं डिमोशन करत तिला बी श्रेणीत पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे राजेश्वरीला 20 लाख रुपये कमी मिळणार आहेत.
तसेच पूजा वस्त्राकर हीला ही फटका बसला आहे. पूजा ब श्रेणीतून क श्रेणीत गेली आहे. यामुळे पूजाला 30 ऐवजी 10 लाख रुपयांवर समाधान मानावं लागणार आहे. तर एकूण 7 जणींचं नशिब फळफळलं आहे. या 7 महिला क्रिेकेटपटूंची पहिल्यांदाच या करारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये यास्तिका भाटीया, राधा यादव, रेणूका ठाकूर, मेघना सिंह, अंजली सरवानी, सबिनेनी मेघना आणि देविका वैद्य यांचा समावेश आहे.