मुंबई : भारतात गेल्या काही दिवसात बऱ्याच घडामोडींना वेग आला आहे. एका पाठोपाठ एक मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. असं असताना लोकसभा निवडणुका आणि आयपीएल स्पर्धांचं नियोजन सर्वात महत्त्वपूर्ण ठरत आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक समोर आलं होतं. 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. सोशल मीडियावर आयपीएल स्पर्धा दुबईत होतील या वावड्या उठल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील सामने दुबईत आयोजित केले जातील असं सांगण्यात येत होतं. मात्र या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. आयपीएलचं संपूर्ण आयोजन भारतातच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कन्फर्म केलं की आयपीएल स्पर्धा भारतातच होईल. दरम्यान, कोरोना कालावधीत आयपीएल स्पर्धेचं आयोजन दुबईत करण्यात आलं होतं. 2020 आणि 2021 आयपीएल स्पर्धा दुबईत पार पडली होती. दुबई, आबुधाबी आणि सारजात सामने झाले होते.
रिपोर्टनुसार, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आयपीएल 2024 स्पर्धेचं आयोजन बाहेर करण्यास नकार दिला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. लोकसभा निवडणून सात टप्प्यात होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जूनपर्यंत सात टप्प्यात मतदान प्रक्रिया चालणार आहे. 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार आहे. निवडणुकांचा तारखा जाहीर झाल्यानंतर आता आयपीएलचं पुढच्या टप्प्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
बीसीसीआयने आयपीएलच्या 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 22 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंतचं वेळापत्रक समोर आलं आहे. यात एकूण 21 सामने खेळवले जाणार आहे. त्यामुळे पुढचं वेळापत्रक राज्यातील निवडणुका आणि इतर बाबी डोळ्यासमोर आखलं जाईल यात शंका नाही. आयपीएल स्पर्धा 21 मेपर्यंत असू शकते. गेल्या वर्षी साखळी फेरी, प्लेऑफ आणि अंतिम फेरी पकडून एकूण 74 सामने झाले होते. दरम्यान, 22 मार्च रोजी पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे.