अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये 1 जूनपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या वर्ल्डकपचा अंतिम सामना 29 जूनला होणार आहे. यावेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचाही कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नवी व्यक्ती असणार आहे, हे आता निश्चित झालं आहे. कारण राहुल द्रविड यांनी कार्यकाळ लांबवण्यास स्षष्ट नकार दिला आहे. एकंदरीत चित्र पाहता बीसीसीआयने आतापासून मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. 27 मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. बीसीसीआयच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी हजारोंच्या संख्येने अर्ज आले आहेत. हे अर्ज पाहून बीसीसीआय अधिकाऱ्यांनाही घाम फुटला. कारण या अर्जात नरेंद्र मोदी, शाहरूख खान, अमित शाह, एमएस धोनी, सचिन तेंडुलकर या सारख्या दिग्गज खेळाडूंची नावं होती. त्यामुळे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना अर्ज छाननी करताना त्रासाला सामोरं जावं लागलं. कारण हे सर्व अर्ज बनावट असल्याचं निश्चित झालं आहे. जवळपास 3000 हजाराहून अधिक बनावट अर्ज प्राप्त झाले आहेत.
बीसीसीआयला बनावट अर्ज प्राप्त होण्याची ही काय पहिली वेळ नाही. यापूर्वी बनावट अर्ज मिळाले आहेत. बीसीसीआयने हे अर्ज बाजूला काढले असून खऱ्या अर्जांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. कारण टीम इंडियाच्या प्रशिक्षपदासाठी योग्य व्यक्ती शोधून पुढची 3.5 वर्षे कार्यभार सांभाळण्यास द्यायचा आहे. बीसीसीआय हे जगातील श्रीमंत बोर्ड आहे. त्यामुळे बनावट अर्ज कसे काय आले? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदसाठी अर्ज गुगल डॉक्युमेंटद्वारे केला होता. त्यामुळे अर्ज भरण्याची मुभा कोणालाही होती. याच कारणामुळे बीसीसीआयकडे अनेक अर्ज दाखल झाले. काही जणांनी याच संधीचा फायदा घेत बनावट नावाने अर्ज केले.
बीसीसीआयच्या सूत्रांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांच्या मते, अर्ज करण्याची प्रक्रिया सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. त्यामुळे अनेक लोकांनी बीसीसीआयच्या वेबसाईटवर जाऊन मुख्य प्रशिक्षपदासाठी अर्ज भरला. आता या प्रक्रियेवर विचार करण्याची गरज आहे. अर्जासाठी आता नव्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल, असं बीसीसीआय सूत्रांनी सांगितलं. या माध्यमातून बनावट अर्जांना लगाम घालता येईल.
नव्या प्रशिक्षकाला कार्यभार 1 जुलैपासून स्वीकारायचा आहे. नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2027 रोजी संपणार आहे. या दरम्यान चॅम्पियन ट्रॉफी, टेस्ट चॅम्पियनशिप, टी20 वर्ल्डकप या सारख्या मोठ्या आयसीसी स्पर्धा आहेत. त्यामुळे टीम इंडियाला जेतेपदाच्या ट्रॅकवर आणून ठेवावं लागणार आहे. राहुल द्रविडच्या कार्यकाळात टीम इंडियाला एकही आयसीसी चषक जिंकता आलेला नाही. टी20 वर्ल्डकप ही शेवटची संधी असून विजय मिळाला नाही तर मात्र नव्या प्रशिक्षकावर जबाबदारी वाढणार आहे. सध्या गौतम गंभीरचं नाव प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर आहे.