आयपीएलच्या 17 व्या हंगामानंतर टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. एकूण 20 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. अशात भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोमवारी रात्री विलंबाने टीम इंडियाच्या हेड कोचपदासाठी अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट करत अर्ज मागवत असल्याची घोषणा केली आहे. हेड कोच म्हणून इच्छूक असलेल्यांना 27 मे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार राहुल द्रविड हे सध्या भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक आहेत. द्रविड हे पुन्हा प्रशिक्षक म्हणून इच्छूक असतील, तर त्यांना अर्ज करावा लागेल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं.
हेड कोच पदासाठी बीसीसीआये सोशल मीडियाद्वारे केलेल्या पोस्टमध्ये अटी आणि नियमांबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार एकूण 3 वर्ष आणि 5 महिन्यांचा कालावधी असणार आहे. नवनियुक्त प्रशिक्षकाकडे टीम इंडियाची धुरा 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे. तर अनुभवाच्या आधारावर वेतन ठरवण्यात येणार आहे.
अर्जदाराचं वय हे 60 वर्षांपेक्षा जास्त नसावं. इच्छुक उमेदवाराला 30 कसोटी किंवा 50 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव असावा किंवा किमान 2 वर्ष कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पाहिल्याचा अनुभव असावा. इच्छूक उमदेवारांची क्रिकेट सल्लागार समितीकडून मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर मुख्य प्रशिक्षकाचं नाव जाहीर करण्यात येईल.
बीसीसीआयने हेड कोच पदासाठी मागवले अर्ज
🚨 News 🚨
The Board of Control for Cricket in India (BCCI) invites applications for the position of Head Coach (Senior Men)
Read More 🔽 #TeamIndiahttps://t.co/5GNlQwgWu0 pic.twitter.com/KY0WKXnrsK
— BCCI (@BCCI) May 13, 2024
दरम्यान राहुल द्रविड यांनी टी 20 वर्ल्ड कप 2021 नंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ हा वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर संपला होता. मात्र आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राहुल द्रविड यांना मुदतवाढ देण्यात आली होती. आता वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राहुल द्रविड या पदावर राहतात की टीम इंडियाला नवा मार्गदर्शक मिळणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.