इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा सुरु झाल्यापासून चर्चेत आहे. आतापर्यंत झालेल्या 17 पर्वात याची प्रचिती आली आहे. आयपीएलच्या 17 सिझनला क्रीडारसिकांची भरभरून दाद मिळाली आहे. तसेच आयपीएल लिलावात खेळाडूंवर होणारी कोट्यवधी रुपयांची उधळण कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे जगभरातील खेळाडू या लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. यासोबत बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंसाठी वुमन्स प्रीमियर लीग सुरु आहे. या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मागच्या दोन वर्षात या स्पर्धेचं स्वरुप बदलताना दिसत आहे. आता बीसीसीआय आयपीएलसारखी आणखी एक लीग सुरु करण्याच्या विचारात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडलेल्या खेळाडूंचं भलं होणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार बीसीसीआय निवृत्त खेळाडूंसाठी एका लीगचं आयोजन करणार आहे. यात माजी क्रिकेटपटू खेळू शकणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, माजी क्रिकेटपटूंनी निवृत्त झालेल्या खेळाडूंसाठी एक लीग सुरु करण्याचा प्रस्ताव बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे दिला आहे. बीसीसीआयला प्रस्ताव खूपच आवडला आहे. इतकंच काय तर या प्रस्तावावर काम देखील सुरु झाल्याचं बोललं जात आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दैनिक जागरणशी बोलताना सांगितलं की, माजी क्रिकेटपटूंनी एक प्रस्ताव बीसीसीआयकडे दिला आहे. आता यावर विचार विनिमय सुरु झाला आहे.
जगभरात सुरु असलेल्या क्रिकेट लीगमध्ये अनेक माजी खेळाडू खेळताना दिसतात. इरफान पठाण, सुरेश रैना, युसूफ पठाण, ख्रिस गेल, हरभजन सिंग, युवराज सिंग या सारख्या दिग्गज खेळाडूंनी लीग स्पर्धेत भाग घेतला आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज, लीजेंड्स लीग क्रिकेट आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धा त्याचाच एक भाग आहेत. बीसीसीआयने माजी क्रिकेटपटूंसाठी लीग सुरु करण्याचा निर्णय घेतला तर नक्कीच त्यात यश मिळेल. कारण बीसीसीआयच्या प्रत्येक निर्णयाला मोठं व्यासपीठ मिळतं. माजी क्रिकेटपटूंच्या लीगला ‘लीजेंड्स प्रीमियर लीग’ असं नाव दिलं जाऊ शकतं. पुढच्या वर्षी ही स्पर्धा सुरु होईल असा अंदाज आहे. या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल यासारखे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा खेळताना दिसू शकतात.