आयीसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तान आणि यूएई येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेत 4 आशियाई संघांसह एकूण 8 टीम सहभागी होणार आहेत. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासह हे 4 संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत भिडणार आहेत. तसेच टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 4 आशियाई संघाचाही चॅम्पियन्स ट्रॉफीत समावेश आहे. अफगाणिस्तानची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होण्याची ही यंदाची पहिलीच वेळ असणार आहे.
इंग्लंडने आघाडी घेत सर्वातआधी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला. इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफीसह भारत दौऱ्यासाठीही संघ जाहीर केला. तर इतर 7 संघ अजूनही वेट एन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम जाहीर करण्यासाठी 12 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. तर 13 फेब्रुवारीपर्यंत आयसीसीच्या परवानगीने संघात बदल करता येईल. त्यामुळे 12 जानेवारीपर्यंत इतर 7 संघाची घोषणा होणार हे निश्चित आहे.
दरम्यान टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i आणि 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. सूत्रांनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 11 जानेवारीला भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. तर 12 जानेवारीला इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेसाठी खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाऊ शकतो. तसेच इंग्लंडविरुद्ध वनडे सीरिजसाठी संधी मिळणाऱ्या खेळाडूंनाच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी मिळेल, असं म्हटलं जात आहे.
दरम्यान या स्पर्धेतील 8 संघांना 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड ए ग्रुपमध्ये आहेत. तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंडचा बी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ गटातील इतर 3 संघांविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही गटातून अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. साखळीनंतर बाद फेरीचा थरार रंगेल.
दरम्यान या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र टीम इंडियाचे सामने हे सुरक्षिततेच्या कारणामुळे यूएईतील दुबईत होणार आहेत. याचा थेट फायदा हा यूएईला होणार आहे.