मुंबई | आशिया कप 2023 च्या आयोजनाचा वाद अनेक महिने चालला. अखेर या वादावर पडदा पडला. या स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने करण्यात येणार असल्याचं ठरलंय. त्यानुसार एकूण 13 पैकी 4 सामन्यांचंच आयोजन हे पाकिस्तानमध्ये करण्यात आलंय. त्यामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला. मात्र यानंतर पाकिस्तानला आणखी एक झटका लागलाय. भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ अर्थात बीसीसीआयने पाकिस्तानला मोठा झटका दिलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने पाकिस्तानची विनंती फेटाळून लावलीय. पाकिस्तानने आगामी वर्ल्ड कपमधील एका सामन्याचं ठिकाण बदलण्यात यावं, अशी मागणी केली होती. बीसीसीआयने पाकिस्तानची मागणी उडवून लावलीय. पाकिस्तान क्रिकेटने पीटीआयच्या हवाल्याने याबाबतचं वृ्त्त दिलंय.
रिपोर्टनुसार, बीसीसीआय आता वेळापत्रकात कोणताही बदल करण्यासाठी तयार नाही. बीसीसीआयनुसार वर्ल्ड कप सामन्यांचं ठिकाण बदलण्यासाठी कारण हवं. पाकिस्तानने अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यांचं ठिकाण बदलण्याची मागणी आयसीसीला केली होती.
आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी अजून वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. मात्र ड्राफ्ट शेड्युलनुसार हे अंदाजे वेळापत्रक समोर आलंय. त्यानुसार पाकिस्तानला अफगाणिस्तान विरुद्ध चेन्नई आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध बंगळुरु इथे खेळायचंय. मात्र पाकिस्तानला या दोन्ही ठिकाणी खेळायचं नाहीये.
पाकिस्तानला नक्की कसली भीती?
पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानुसार, चेन्नईची खेळपट्टी ही फिरकीसाठी पूर आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरु शकते. तर पाकिस्तानकडे सिक्ल्ड स्लो बॉलर्स आहे, जे चेन्नईच्या खेळपट्टीवर धमाका करु शकतात.
तसेच अफगाणिस्तानला पाकिस्तानच्या कमी-जास्त बाजू माहितीये. त्यामुळे या गोष्टीचा फटका बसू नये यासाठी पाकिस्तानची ही केविळवाणी धडपड सुरु होती. मात्र बीसीसीआयने थेट विनंती उडवून लावल्याने आता विषयच संपलाय. बीसीसीआय संबंधित सूत्रांनुसार, पाकिस्तानने 2016 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतही सुरक्षेचं कारण पुढे करत ठिकाण बदलण्याची मागणी केली होती.
दरम्यान आता वनडे वर्ल्ड कप आणि आशिया कप स्पर्धेला अजून वेळ आहे. सध्या अॅशेस सीरिजमधील पहिल्या कसोटी सामना सुरु आहे. हा सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. मात्र पाचव्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी पावसाला सुरुवात झालीय. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 7 विकेट्स आणि ऑस्ट्रेलियाला 174 धावांची गरज आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलंय.