मुंबई : टी-20 वर्ल्ड कप 2024 ला आता अवघे काही महिने बाकी आहेत. यंदाचा टी-20 वर्ल्ड कप जून महिन्यामध्ये वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र तो दुखापती असल्याने त्याच्या जागी सूर्यकुमार यादव याच्यावर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीये. वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-20 मालिकेध्ये सूर्या कॅप्टन होता. आता आफ्रिका दौऱ्यावरही त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आलंय. मात्र येत्या वर्ल्ड कपमध्ये संघाचं कर्णधारपदी कोण असणार याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार कोण असणार याबाबत आताच बोलण्याची काही गरज नाही. कारण जूनमध्ये टी-20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. त्याआधी आयपीएल आणि अफगाणिस्तानविरूद्धची टी-20 मालिका होणार आहे. त्यानंतर जे परिस्थिती पाहता निर्णय घेण्यात येतील, असं जय शहा म्हणाले. जय शहा यांच्या वक्तव्याची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. कारण जर रोहित शर्मा कॅप्टन आहे तर जय शहा यांनी थेट त्याचं नाव का घेतलं नाही. रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार आहे. आता सुरू होणाऱ्या आफ्रिकेविरूद्धच्या सीरीजमध्ये त्याने व्हाईट बॉल क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती.
जय शहा यांनी रोहितचं नाव न घेता वर्ल्ड कप सूरू होण्यासाठी वेळ आहे असं म्हटल्यामुळे क्रिकेट वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये नवीन युवा कर्णधार पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र यामुळे हिटमॅनचे चाहते नाराज असावेत. कारण वर्ल्ड कपमध्ये रोहितने वैयक्तिक विचार न करता संघाच्या गरजेनुसार बॅटींग केली. परंतु फायनलमध्ये संघाच्या पदरी पराभव पडला.
दक्षिण आफ्रिका दौरा झाल्यावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या कार्यकाळाचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. आम्ही त्यांचा कार्यकाळ वाढवला आहे पण अद्याप करार निश्चित केलेला नसल्याचं शहा यांनी सांगितलं.