श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता बांगलादेश विरुद्ध मायदेशात बांगलादेश विरुद्ध क्रिकेट खेळायला तयार झाली आहे. टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध कसोटी आणि टी 20i मालिका खेळणार आहे. बांगलादेशच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही 19 सप्टेंबरपासून होणार आहे. कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी 8 सप्टेंबरला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. विराट कोहलीचं अनेक महिन्यांनी कमबॅक झालं आहे. तर जसप्रीत बुमराह याच्याकडे बॉलिंगची जबाबदारी असणार आहे. तर यश दयालला पहिल्यांदाच संधी दिली गेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या अनुभवी त्रिकुटाकडे पुन्हा एकदा बीसीसीआय निवड समितीने दुर्लक्ष केलं आहे.
अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा या तिघांबाबत आपण बोलतोय. या तिघांचं वय हे 36 वर्ष आहे. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे वर्षभरापासून टीम इंडियापासून बाहेर आहेत. तर इशांत शर्मा याला तर जवळपास 3 वर्षांपासून संधीच मिळालेली नाही. अजिंक्यने त्याचा अखेरचा कसोटी सामना हा विंडिज विरुद्ध जुलै 2023 मध्ये खेळलाय. पुजारा जून 2023 साली अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तर इशांत शर्मा याला अखेरची संधी 2021 मध्ये मिळाली होती. इशांतने न्यूझीलंड विरुद्ध नोव्हेंबर 2021 मध्ये अखेरची टेस्ट मॅच खेळली होती. या तिघांकडे निवड समितीकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे या तिघांकडे आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
इशांत, पुजारा आणि रहाणे या तिघांना कसोटी क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. या तिघांनी अनुक्रमे 105, 103 आणि 85 असे सामने खेळले आहेत. अजिंक्य रहाणे याने टीम इंडियाचं नेतृत्वही केलंय. मात्र प्रतिभावान युवा खेळाडूंमुळे या अनुभवी त्रिुकटाला संधी मिळणं अवघड होऊन बसलंय. त्यामुळे आता या तिघांना पुढील काही मालिकांसाठी संधी मिळणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.