मुंबई | नवनिर्वाचित अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ निवडला आहे. बीसीसीआयने या भारतीय संघांची ट्विटद्वारे घोषणा केली आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभयसंघात कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी याआधीच संघ जाहीर केला होता. त्यानंतर आता 12 दिवसांनी टी 20 संघाची घोषणा करण्यात आली आहे.
निवड समितीने या टी 20 मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना आराम दिलाय. तर आयपीएल 16 व्या मोसमात शानदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंवर विश्वास दाखवत संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा या दोघांना टी 20 मालिकेत स्थान दिलं. तर दुसऱ्या बाजूला आयपीएलचा 16 वा मोसम खऱ्या अर्थाने गाजवणाऱ्या रिंकू सिंह याच्या पदरी निराशा पडली आहे.
रिंकू या मालिकेसाठी प्रबळ दावेदार होता. तसेच रिंकूची निवड निश्चित मानली जात होती. मात्र बीसीसीआयने संधी न दिल्याने रिंकूची टीम इंडियात निवड होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. आता रिंकूला संधीसाठी आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध ऑगस्ट महिन्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे.
आयपीएलचा 16 वा मोसम नुकताच पार पडला. रिंकूने या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून 14 सामने खेळले. रिंकूने या साखळी फेरीतील 14 सामन्यांमध्ये 59.25 च्या सरासरी आणि 149.53 स्ट्राईक रेटने 474 धावा केल्या. रिंकूने या खेळीत 31 फोर आणि 29 सिक्स ठोकले. तसेच 4 अर्धशतकंही लगावली. लखनऊ विरुद्धची नाबाद 67 धावांची खेळी ही रिंकूच्या आयपीएल कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया टी 20 सीरिज वेळापत्रक
? JUST IN: Few fresh faces in India's T20I squad for the West Indies tour!
More ?https://t.co/8Za4WyCcoZ
— ICC (@ICC) July 5, 2023
पहिला सामना, 3 ऑगस्ट.
दुसरा सामना, 6 ऑगस्ट.
तिसरा सामना, 8 ऑगस्ट.
चौथा सामना, 12 ऑगस्ट.
पाचवा सामना – 13 ऑगस्ट.
हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.