आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तान आणि यूएईमध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडियाचे सर्व सामने हे यूएईत होणार आहेत. तर इतर संघांचे सामने हे पाकिस्तानमध्ये होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण संघ सहभागी झाले आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान व्यतिरिक्त इतर 6 संघांनी या स्पर्धेसाठी त्यांच्या खेळाडूंची नावं जहीर केली आहेत. यजमान पाकिस्तान आणि टीम इंडिया अजून वेट एन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय निवड समिती देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाची घोषणा करणार आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 12 जानेवारीपर्यंत संघाची घोषणा करणं बंधनकारक होतं. मात्र टीम इंडिया आणि पाकिस्तानने संघ जाहीर केला नाही. बीसीसीआयने संघ निवडीसाठी अधिकचा वेळ मागून घेतला आहे. अशात आता विजय हजारे ट्रॉफी फायनल मॅचनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला जाईल, असं म्हटलं जात आहे. विजय हजारे ट्रॉफीत आता 2 उपांत्य आणि अंतिम सामना होणं बाकी आहे. विजय हजारे ट्रॉफी 15 आणि 16 जानेवारी रोजी उपांत्य फेरीतील सामने पार पडतील. तर 18 जानेवारीला अंतिम सामना पार पडेल.
आता विजय हजारे ट्रॉफी महाअंतिम सामना 18 जानेवारीला पार पडेल. त्यामुळे 19 जानेवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. बीसीसीआयची 12 जानेवारी रोजी मुंबईत वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या सभेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? याबाबतचे संकेत दिले होते. निवड समितीची 18 किंवा 19 जानेवारीला बैठक होईल, असं शुक्ला यांनी म्हटलं होतं.
दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी आणि चॅम्पिन्स ट्रॉफीसाठी करुण नायर आणि मयंक अग्रवाल या दोघांना संधी मिळू शकते. या दोघांनी आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफीतील यंदाच्या हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दोन्ही खेळाडूंनी 600 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
मयंकने 8 सामन्यांमध्ये 123.80 च्या सरासरीने 4 शतकं आणि 1 अर्धशतकासह 619 धावा केल्या आहेत. तर करुण नायर याने 7 सामन्यांमधील 6 डावांमध्ये 664 धावा केल्या आहेत. करुणने या दरम्यान एकूण 5 आणि सलग 4 शतकं झळकावली आहेत. टीम इंडियातून हे दोन्ही खेळाडू बाहेर आहेत. मात्र आता या दोघांच्या कमबॅकची आशा वाढली आहे.