मुंबई | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या टेस्टमध्ये 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडिया यासह 2 सामन्यांची मालिका 1-1 ने सोडवण्यात यशस्वी ठरली. तसेच टीम इंडियाने नवीन वर्षाची सुरुवातही विजयाने केली. त्यामुळे आता टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे. टीम इंडिया आता मायगदेशात परतल्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिका आणि इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या 3 सामन्यांची टी 20 मालिका ही 11 ते 17 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 25 जानेवारी ते 11 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. आता या दोन्ही मालिकांपैकी पहिल्या मालिकेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहे. त्यानंतरही टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. या दरम्यना मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितानुसार, अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिज आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 पैकी पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी बैठक होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टी 20 मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे टीम इंडियाचे 2 दिग्गज निवडीसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे या दोघांची निवड झाली, तर हे दोघे 2022 टी 20 वर्ल्ड कपनंतर खेळताना दिसतील. विराट-रोहित टी 20 वर्ल्ड कप 2022 पासून शॉर्ट फॉर्मेटपासून दूर आहेत.
रोहित टी 20 क्रिकेटमधून दूर गेल्यापासून हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव हे दोघे टीम इंडियाचं नेतृत्व करत आहेत. मात्र हार्दिक पंड्या याला वर्ल्ड कप 2023 दरम्यान दुखापत झाली. तर सूर्यकुमार यादव यालाही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 सीरिजमध्ये दुखापत झाली. त्यामुळे हे दोघेही सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध निवड समितीला नाईलाजाने रोहित शर्मा याला कर्णधार करावं लागेल. तसेच निवड समिती अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांना विश्रांती देऊ शकते.
तसेच त्यानंतर इंग्लंड विरद्ध होणारी 5 सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 च्या हिशोबाने फार महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे निवड समिती आता कोणत्या खेळाडूंना संधी देते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.