आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी बऱ्याच उलथापालथी होताना दिसत आहेत. मेगा लिलावानंतर संघांचं रुपडं पालटणार आहे. काही संघांचे कर्णधारही बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल 2025 स्पर्धा सर्वच अंगांनी उत्सुकतेने भरलेली असेल यात शंका नाही. त्याचबरोबर नियमात बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील दोन नियमांची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. यात इम्पॅक्ट प्लेयर हा नियम सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. एका षटकात दोन बाउंसर चेंडू या नियमामुळे लिलावात वेगवान गोलंदाजांना भाव मिळाला होता. याच नियमामुळे पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कसाठी कोट्यवधी रुपये मोजले गेले होते. पण हे दोन्ही नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाहीत. पण बीसीसीआयने आयपीएलमधील उत्कंठा वाढावी यासाठी हे नियम लागू केले होते. हा नियम लागू करण्यापूर्वी याची ट्रायल देशांतर्गत टी20 स्पर्धेत घेतली गेली होती. सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत हा नियम लागू केला होता. यशस्वीरित्या हा नियम लागू झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलमध्ये हा नियम लागू केला.
आयपीएलमध्ये दोन्ही नियम लागू झाले, पण सर्वाधिक चर्चा रंगली ती इम्पॅक्ट प्लेयर नियमाची. काही खेळाडू, प्रशिक्षकांनी या नियमाला विरोध केला. पण दोन बाउंसर नियमाबाबत पूर्ण स्पर्धेत काहीच चर्चा झाली नाही. उलट हा नियम गोलंदाजांच्या पक्षात असल्याने फायदाच झाला. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय या नियमांबाबत चर्चा करत आहे. हे दोन्ही नियम मुश्ताक अली स्पर्धेच्या नव्या पर्वात लागू करायचे की नाही याबाबत खलबतं सुरु आहेत. म्हणून बीसीसीआयने या नियमांबाबत राज्य क्रिकेट संघांना स्पर्धेच्या प्लेइंग कंडिशन काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळे या दोन नियमांचा निकाल लागू शकतो.
बीसीसीआयने हे दोन्ही नियम मुश्ताक अली स्पर्धेतून काढून टाकले तर आयपीएल 2025 स्पर्धेतही हे नियम पाहायला मिळणार नाहीत. एका अर्थाने यावर शिक्कामोर्तब होईल. जर मुश्ताक अली स्पर्धेत नियम लागू झाला तर आयपीएलच्या पुढच्या पर्वात हा नियम असेल. इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंची वाट बिकट होईल असं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा, विराट कोहली यांनी या नियमाला विरोध केला आहे. रिकी पाँटिंगनेही हा नियम काढून टाकला पाहीजे असं सांगितलं आहे.