चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेपूर्वी मालिका पराभव होताच कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान, सांगितलं की…

| Updated on: Aug 07, 2024 | 9:44 PM

श्रीलंकेने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताला 2-0 ने पराभूत केलं. या विजयासह 27 वर्षानंतर मालिकेत विजयाची चव चाखली आहे. दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची तयारी आणि प्रशिक्षक गौतम गंभीर याचा चांगलाच कस लागणार आहे. असं सर्व असताना कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया खूपच बोलकी ठरली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत काही बोलला नसला तरी बरंच काही सांगून गेला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेपूर्वी मालिका पराभव होताच कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान, सांगितलं की...
Image Credit source: Sri Lanka Social Media
Follow us on

भारतविरुद्धची वनडे मालिका श्रीलंकेने 2-0 ने खिशात घातली. या मालिकेत खरं तर भारताला कमबॅक करण्याची संधी होती. पहिलाच सामना बरोबरीत सुटल्याने टीम इंडिया बॅकफूटला गेली. त्यामुळे श्रीलंकेचा आत्मविश्वास चांगलाच वाढला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने 32 धावांनी टीम इंडियाला पराभूत केलं. खरं तर तिसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचं नशिब फुटकं निघालं. कारण सलग तिसऱ्यांदा नाणेफेक गमवावी लागली आणि पुन्हा एकदा वाटेला गोलंदाजी आली. त्यामुळे दुपारच्या सत्राचा श्रीलंकेने फायदा घेतला आणि 248 धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यानंतर खेळपट्टीने फिरकीपटूंना साथ देण्यास सुरुवात केली आणि भारतीय फलंदाजांनी एका पाठोपाठ एक अशी नांगी टाकण्यास सुरुवात केली. 248 धावांचा पाठला करताना टीम इंडिया 138 धावांपर्यंत मजल मारू शकली. तिसऱ्या सामन्यातही रोहित शर्माने मोठी धावसंख्या केली. इतर फलंदाज तर आले तसेच परत गेले. त्यामुळे 27 वर्षानंतर टीम इंडियाला मालिकेत पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. असं असताना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीला मात्र गालबोट लागलं आहे. कारण प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिला आयसीसी चषक असणार आहे.

सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पराभवाचं विश्लेषण केलं. नेमकं काय चुकलं आणि काय सुधारणा करायला हव्यात याबद्दल मत मांडलं. यावेळी फिरकीचा सामना करताना काही अडचण नाही असंही स्पष्ट सांगितलं. ‘या मालिकेतून आपल्याला वैयक्तिकरित्या आणि गेमप्लान म्हणून पाहावे लागेल.’ असं रोहित शर्मा म्हणाला. ‘श्रीलंकन संघ आमच्यापेक्षा चांगला खेळला. आम्ही परिस्थितीनुसार संघात बदल केला. यातून काही खेळाडूंची चाचपणी देखील करायची होती. या मालिकेतील सकारात्मक गोष्टींपेक्षा आम्हाला काही भागात काम करणं गरजेचं आहे. कारण पुढच्या वेळी अशा परिस्थितीचा सामना करताना आणखी चांगली तयारी करता येईल.’ असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.

श्रीलंका मालिकेपासून खरं तर चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी सुरु झाली आहे. सहा महिन्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी असून वनडे फॉर्मेटमध्ये आहे. त्यामुळे या मालिकेतून बऱ्याच उणीवा समोर आल्या आहेत. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्माला यावर खूप काम करावं लागणार आहे. असं असताना रोहित शर्माने शेवटी केलेलं विधान खूपच महत्त्वाचं ठरलं आहे. “मालिका गमवणे म्हणजे जगाचा अंत नाही. तुम्ही एखाद दुसरी मालिका इकडे तिकडे गमवाल. पण पराभवानंतर तुम्ही कशा पद्धतीने कमबॅक करता हे महत्त्वाचं आहे.”, असं रोहित शर्मा म्हणाला. रोहित शर्माचं हे वक्तव्य क्रीडारसिक चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने घेत आहेत.