कर्णधार रोहित शर्माच्या मनातलं आलं ओठात, गंभीर-द्रविडच्या कोचिंगची तुलना करत सांगितलं की..

| Updated on: Sep 17, 2024 | 3:35 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कंबर कसली आहे. असं असताना गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या मनातलं आलं ओठात, गंभीर-द्रविडच्या कोचिंगची तुलना करत सांगितलं की..
Follow us on

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला बांग्लादेश कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेवर बरंच गणित अवलंबून आहे. त्यामुळे ही मालिका किती महत्त्वाची आहे याचा अंदाज येतो. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर या दोघांच्या एकत्रित कारकिर्दितील ही पहिली कसोटी मालिका आहे. त्यामुळे या दोन सामन्यांसाठी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी खास रणनिती आखली आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्माने राहुल द्रविड आणि गौतम गंभीर यांच्या कोचिंग स्टाईलवर स्पष्ट मत मांडलं. रोहित शर्माने सांगितलं की, ‘राहुल भाई, विक्रम राठोड आणि पारस म्हाम्ब्रे ही एक वेगळी टीम होती हे जाहीर आहे. तर नवीन कोचिंग स्टाफ वेगळ्या दृष्टीकोनासह आला असून ते स्वीकार्य आहे. नव्या कोचिंग स्टाफची स्टाईल वेगळी आहे. पण यात कोणतीच अडचणी नाही. चांगली समज असणं गरजेचे आहे आणि गंभीरसोबत माझी हीच समज आहे.’

रोहित शर्माने पुढे सांगितलं की, बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका ही ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी रंगीततालिम नाही. आमच्यासाठी प्रत्येक मालिका प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 13 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यात भारताने 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत. भारताने बांगलादेशविरुद्ध अद्याप एकही कसोटी सामना गमावलेला नाही. दुसरीकडे, बांगलादेशने नुकतंच पाकिस्तानला त्यांच्यात भूमीवर 2-0 ने लोळवलं होतं. त्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास दुणावलेला आहे.

प्रतिस्पर्धी संघांकडून पराभूत करण्याचा इशारा दिला जात आहे याकडे पत्रकार परिषदेत लक्ष वेधून घेतलं. तेव्हा त्याने यावर मजेशीर उत्तर दिलं. ‘सर्वच संघाना टीम इंडियाला हरवण्यासाठी मजा येते. त्यांना मजा घेऊ द्या. जेव्हा इंग्लंडचा संघ आला होता तेव्हा पत्रकार परिषदेत त्यांनी खूप काही सांगितलं होतं. पण आमचं लक्ष त्यावर नाही. आम्ही चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो.’, असं कर्णधार रोहित शर्माने सांगत आपला हेतू स्पष्ट केला आहे. इंग्लंडचा संघ भारतात आला होता तेव्हा त्यांनी भारताला पहिल्या कसोटीत पराभूत केलं होतं. पण त्यानंतर उर्वरित 4 कसोटी भारताने पराभवाचं पाणी पाजलं आणि मालिका 4-1 ने जिंकली.