आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू आहे. भारतामध्ये आयपीएल म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक प्रकारे उत्सवच असतो. आयपीएलची क्रेज सर्वांनाच माहित आहे. आयपीएलही अनेक खेळाडूंसाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची एक शिडी झाली आहे. टीम इंडियालाही याच आयपीएलमधून जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्यासारखे तगडे खेळाडू मिळाले आहेत. संपूर्ण जगभरात आयपीएलची चर्चा होते ती सामना दरम्यान होणाऱ्या करोडोंच्या उलाढालीमुळे. पण, तुम्हाला माहित आहे का की आयपीएल नेमकी कशी आणि का सुरू झाली? आयपीएल सुरू होण्याआधी झी कंपनीचे मालक सुभाष चंद्रा आणि बीसीसीआयमध्ये काय महाभारत झालं होतं? त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार होते. त्यावेळी नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या सविस्तर.
2003 मध्ये इंग्लंडमध्ये टी – 20 क्रिकेटला सुरूवात झाली. जगभरात टी-20 क्रिकेटच लोण पसरलं होतं. मात्र, भारतात त्याची म्हणावी तशी काही क्रेझ नव्हती. या काळातच झी कंपनीचे मालक सुभाष चंद्रा यांनी 2003, 2005 आणि 2006 मध्ये स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंगच्या हक्कासाठी बिडिंग केलं. मात्र, कमी अनुभव अशा कारणांमुळे त्यांना ते काही मिळत नव्हतं. त्यावेळी बीसीसीआयच्या निवडणुकीमध्ये चंद्रा यांनी शरद पवार यांना पाठिंबा देत जगमोहन दालमिया यांचा पराभव केला. मात्र, त्यानंतरही सुभाष चंद्रा यांना ब्रॉडकास्टिंगचे हक्क मिळाले नाहीत. टी-20 क्रिकेट भारतातही वाढणार हे चंद्रा यांच्या लक्षात आलं होतं. आयसीसीने 2007 साली पहिल्या टी-20 वर्ल्ड कपची घोषणा केली होती. त्याआधीच सुभााष चंद्रा यांनी मे 2007 मध्ये आयसीएल म्हणजेच (Indian Cricket League) ची घोषणा केली.
मुंबई चॅम्प्स, चेन्नई सुपरस्टार्स, चंदीगड लायन्स, हैदराबाद हिरोज, रॉयल बंगाल टायगर्स (कोलकाता), दिल्ली दिग्गज, अहमदाबाद रॉकेट्स, लाहोर बादशहा आणि ढाका वॉरियर्स असे नऊ संघ इंडियन क्रिकेट लीगमध्ये सहभागी झाले होते.
सुभाष चंद्रा यांच्या आयसीएलमध्ये जगभरातील नावाजलेले खेळाडू ब्रायन लारा, इंजमाम हे सहभागी झाले होते. तर मदन लाल, किरण मोरे आणि शेन बाँड यांना कमिटीमध्ये सहभागी करून घेतलं. या बोर्डाचे चेअरमन कपिल देव होते. या लीगची जगभरात चर्चा झाली पण बीसीसीआयला हे काही पटलं नाही. बीसीसीआयनेही एक आठवड्यातच आयसीएलला थांबवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. आयसीएलची घोषणा झाल्यावर बीसीसीआयने एक आठवड्यातच ही लीग अधिकृत नसल्याचं जाहीर केलं. आयसीसीसह सर्व देशांच्या क्रिकेट बोर्डासोबत संपर्क साधत आयसीएलमध्ये सहभागी खेळाडूंना सहभागी होऊ देऊ नका असं सांगितलं. त्यासोबतच भारतीय खेळाडूंनाही ताकीद देण्यात आली की जे खेळाडू या लीगमध्ये सहभागी होतील त्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळणार नाही.
आयसीएलमध्ये भारतीय क्रिकेट संघातील बीसीसीआयसोबत करारबद्ध खेळाडू फिरकले नाहीत. कारण, बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. बीसीसीआयने या लीगमध्ये स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाही इशारा दिला होता. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचे आणि खेळाडूंचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. बीसीसीआयने खेळाडूंना थांबवलं होतं. पण पाकिस्तान आणि बांगलादेश संघातील मुख्य खेळाडू मोठ्या संख्येने आयसीएलमध्ये सहभागी होत होते. विशेष म्हणजे आयसीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडू आल्याने बांगलादेशकडे राष्ट्रीय संघात सामन्यासाठी खेळाडू कमी पडले होते. बीसीसीआयने त्यानंतर राज्य असोसिएशनचे कोणतेही मैदान आयसीएलला द्यायचे नाही असे आदेश दिले. बीसीसीआयने लोकल स्पर्धांसाठी हे ग्राऊंड्स बुक केले. त्यामुळे आता खेळाडू होते पण ग्राऊंड नव्हते. सुभाष चंद्रा यांनीही हार मानली नाही, त्यांनी अशी दोन मैदाने घेतलीत जी राज्य सरकारच्या हातात होतीत. यामध्ये कोलकातामधील ईडन गार्डन आणि अहमदाबादमधील एक स्टेट ग्राऊंड होतं.
बीसीसीआयने या दरम्यान मोठी खेळी केली ती म्हणजे भारताकडून बीसीसीआय उपाध्यक्ष ललित मोदी, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी आयसीसी कमिटीसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये आयसीसीच्या संविधानामध्ये बदल करण्यात आला. हा बदल म्हणजे कोणत्याही खासगी टूर्नामेंटला अधिकृत दर्जा संबंधित देशाचे क्रिकेट बोर्ड देणार आणि यामध्ये आयसीसी कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. आता कायद्यानेही बीसीसीआयने आपली बाजू भक्कम केली होती. इतकंच नाहीतर बीसीसीआयने आपली स्वत:ची लीग सुरु करण्याचं ठरवलं. याची संपूर्ण जबाबदारी ललित मोदींकडे होती. ललित मोदी हे राजस्थान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तर बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते.
ललित मोदी यांनी अमेरिकेतील मेजर बेज बॉल लीगसारखं टी-20फॉरमॅटमध्ये सिटी बेस फ्रँचायसी मॉडेलच्या आधारावर स्पर्धा सुरू करण्याचं ठरवलं. आयपीएलसाठी ललित मोदी यांनी सर्व देशांच्या क्रिकेट बोर्डसोबत बैठका घेत घेतल्या आणि प्रत्येक देशाला दोन महिन्यांसाठी आयपीएलसाठी मूभा देण्यात यावी यासाठी मनवलं. आयपीएलमुळे खेळाडूंना होणारे फायदे याबाबतही माहिती दिली. मीडिया रिपोर्टनुसार आयपीएल टीमच्या फ्रंचायझींसाठी ललित मोदी यांनी आपला वर्गमित्र अभिनेता शाहरूख खान याची भेट घेत त्याला यासाठी मनवलं. त्यानंतर थायलंडमध्ये जाऊन अभिनेत्री प्रीती झिंटालाही त्याची माहिती देत आपल्याबाजूने आणलं. त्यामुळे शाहरूखने कोलकाता नाईट रायडर्स तर प्रीतीने पंजाबचा संघ खरेदी केला.
पहिल्या आयपीएलमध्ये आठ संघ होते. यासाठी फ्रँचायजी देणार असल्याचं ललित मोदी यांनी सांगितलं. मुंबई फ्रँचायझी उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजय मल्ल्या, मीडिया हाऊस डेक्कन क्रॉनिकलने हैदराबाद, इंडियन सिमेंट्स चेन्नईची फ्रँचायझी खरेदी केली. GMR कंपनीने दिल्ली फ्रँचायझीने खरेदी केलं. आता एका फ्रँचायझीमध्ये जवळपास वीस ते बावीस खेळाडू असतात. त्यासोबतच सपोर्ट स्टाफचाही यामध्ये समावेश असतो. या सर्वांची राहण्याची सोय हॉटेल आणि प्रवास विमानाने केली जाते.
आयपीएलमधील पहिला सामना केकेआर आणि आरसीबीमध्ये पार पडला होता. या सामन्यात केकेआरच्या ब्रेंडन मॅकलम याने 73 बॉलमध्ये 13 षटकार आणि 10 चौकारांची बरसात करत 158 धावा केल्या. मात्र बंगळुरूचा संघ अवघ्या 82 धावांवर ऑल आऊट झाला. प्रवीण कुमार सोडता एकही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नव्हती. पहिल्या सीझनमध्ये अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला दिसले होते. पाकिस्तानच्या खेळाडूंनीही आयपीएल खेळली मात्र भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.
दरम्यान, आयपीएलचं आयोजन जे उद्दिष्ठ ठेवून करण्यात आलं होतं हे पहिल्याच सीझनमध्ये दिसून आलं. आयपीएलचा सतरावा हंगाम सुरू आहे. यामध्ये अनेक खेळाडू असे आहेत जे आयपीएलच्या पहिल्या सीझनपासून आताही आपल्याला खेळत असलेले दिसत आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ आतापर्यंत सर्वाधिक पाचवेळा जिंकले आहेत.
2008 राजस्थान रॉयल्स, 2009 डेक्कन चार्जर्स, 2010 चेन्नई सुपर किंग्ज, 2011 चेन्नई सुपर किंग्ज, 2012 कोलकाता नाइट रायडर्स, 2013 मुंबई इंडियन्स, 2014 कोलकाता नाइट रायडर्स, 2015 मुंबई इंडियन्स, 2016 सनरायझर्स हैदराबाद, 2016 सनरायझर्स हैदराबाद, 2017 मुंबई इंडियन्स, 2018 चेन्नई सुपर किंग्ज, 2019 मुंबई इंडियन्स, 2020 मुंबई इंडियन्स, 2021 चेन्नई सुपर किंग्ज, 2022 गुजरात टायटन्स, 2023 चेन्नई सुपर किंग्ज