आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सची स्थिती एकदम नाजूक आहे. आतापर्यंत खेळलेल्या दहा सामन्यात मुंबईने फक्त 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. असं असताना ओपनर रोहित शर्माबाबत एक बाब वारंवार अधोरेखित झाली आहे. या दहा सामन्यापैकी पाच सामन्यात त्याचा विक पॉइंट समोर आला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अडचण येऊ शकते. मागच्या दोन टी20 वर्ल्डकपमध्येही ही अडचण अधोरेखित झाली होती. आयपीएल स्पर्धेत रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली आहे. छोटी पण आक्रमक खेळी करत रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून दिली आहे. मागच्या दहा डावात रोहित शर्मा एकदा नाबाद राहिला आहे. यावेळी त्याने शतकी खेळी केली होती. रोहित शर्माने 158 च्या स्ट्राईक रेट आणि 35च्या सरासरीने 315 धावा केल्या. पण आयपीएलमध्ये पुन्हा एकदा जुनी समस्या दिसून आली आहे. राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्सविरुद्ध ही अडचण प्रामुख्याने दिसून आली आहे.
रोहित शर्माची सर्वात मोठी अडचण ही डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा सामना करणं. खासकरून स्विंग करणाऱ्या गोलंदाजांसमोर हतबल दिसून आला आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये 9 वेळा बाद झाला आहे. त्यापैकी पाच वेळा डावखुऱ्या गोलंदाजांनी त्याला तंबूचा रस्ता दाखवला आहे. यात तीनवेळा अशा गोलंदाजांसमोर बाद झाला आहे, त्यांचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सामना होण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्ससाठी खेळणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट त्यापैकी एक आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत दोनदा तंबूत पाठवलं आहे. वर्ल्डकपच्या सुपर 8 फेरीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होऊ शकतो. त्यामुळे रोहित शर्माला अडचण येऊ शकते.
पंजाब किंग्सचा अष्टपैलू सॅम करननेही रोहित शर्माला आपल्या जाळ्यात ओढलं आहे. पण या सामन्यात रोहित शर्माने चांगली खेळी केली होती. दुसरीकडे, भारताचे दोन युवा गोलंदाज लखनौ सुपर जायंट्सचा मोहसिन खान, दिल्ली कॅपिटल्सचा खलील अहमदने रोहितला बाद केलं आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांना कसं सामोरं जातो याकडे लक्ष लागून आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (वीसी), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.