चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानची आणखी एक खेळी, असा आखला मास्टर प्लान

| Updated on: Jul 08, 2024 | 5:01 PM

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचं पाकिस्तान आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. इतकंच काय तर दोन गट पाडले असून भारत-पाकिस्तान सामन्याची तारीखहीन निश्चित केली आहे. या स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी पाकिस्तान संघ जोरदार तयारी करत आहे. यासाठी एक मास्टर प्लान आखला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानची आणखी एक खेळी, असा आखला मास्टर प्लान
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानवर साखळी फेरीतून बाद होण्याची नामुष्की ओढावली. प्रबळ जेतेपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेसारख्या दुबळ्या संघाने पराभूत केले. त्यानंतर भारताने विजयासाठी दिलेलं 119 धावांन आव्हानही गाठता आलं नाही. त्यामुळे पाकिस्तान संघ सर्वच स्तरातून टीकेचे धनी ठरले. मात्र या पराभवातून सावरून पाकिस्तान संघ पुढच्या तयारीला लागला आहे. आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ भाग घेणार आहेत. भारत, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया हे संघ जेतेपदासाठी लढणार आहेत. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 9 मार्चला या स्पर्धेतील अंतिम सामना होईल. तर 1 मार्चला भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक आधीच आयसीसीकडे पाठवण्यात आले असून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. ग्रुप-ए मध्ये असलेली टीम इंडिया पहिल्या सामन्यात बांगलादेश आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड आणि तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानशी लढणार आहे.

प्रारुप वेळापत्रकानुसार 20 फेब्रुवारीला भारत विरुद्ध बांग्लादेश, 23 फेब्रुवारीला भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि 1 मार्चला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या मालिकेत टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. 6 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला हे सामने होतील. पण असं सर्व असताना पाकिस्तानने मास्टर प्लान आखला आहे. पाकिस्तान या स्पर्धेपूर्वी ट्राय सीरिजचं आयोजन करण्याची योजना आखली आहे.

पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात ही लढत होणार आहे. ही एकदिवसीय मालिका 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होण्याची शक्यता असल्याने पाकिस्तान संघ या माध्यमातून आपली चाचणी घेणार आहे. 8 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, 10 फेब्रुवारी दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, 12 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका असे सामने होती. तर 14 फेब्रुवारीला अंतिम फेरीचा सामना होईल.